iPhone Crime News : iPhone घ्यावा अशी अनेकांची इच्छा असते. सर्वात महागडा फोन अशी apple iphone ची ओळख. यामुळेच किडनी विकून आयफोन घेतला यासारखे मीम्स नेहमीच बनत असतात. मीम्सपर्यंत ठीक आहे. पण, एका तरुणाने आयफोन मिळण्यासाठी खूप मोठा गुन्हा केला आहे. ऑनलाईन फोन ऑर्डर केला. यानंतर फोन घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला द्यायला 46 हजार रुपये नव्हते म्हणून या तरुणानाने त्याच्यासह जे काही केले ते पाहून पोलिसही हादरले आहेत. कर्नाटक मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे (Crime News).
आयफोनची क्रेझ जगभरात आहे. मात्र, याची किंमत जास्त असल्याने अनेकजण हा फोन घेवू शकत नाहीत. अशातच कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. आयफोन मिळवण्यासाठी एका 20 वर्षीय तरुणाने मोठा कट रचला.
हेमंत दत्ता (वय 20 वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हेमंत हा अर्सिकेरे शहरातील लक्ष्मीपुरा लेआऊटमध्ये राहतो. हेमंतने ऑनलाइन आयफोन बुक केला होता. ई-कार्टचे डिलिव्हरी बॉय हेमंत नाईक ही ऑर्डर घेवून आले. आयफोनची डिलिव्हरी करण्यासाठी हेमंत नाईक हे लक्ष्मीपुरा भागातील हेमंत दत्ता यांच्या घरी वेळेवर पोहोचले. फोन डिलिव्हरी होताच डिलीव्हरी बॉयने फोनसाठी 46 हजार रुपये भरण्यास सांगितले.
हेमंत नाईक पैशासाठी दारातच थांबला होता. हेमंत दत्ता याने डिलीव्हरी बॉयला घरात बोलावून घेतले. डिलीव्हरी बॉय घरात येताच हेमंत दत्ता याने त्याच्यावर हल्ला केला. हेमंतने त्याच्या चाकूने एकामागून एक वार केले. डिलीव्हरी बॉयची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे हेमंतला समजत नव्हते. त्यामुळे त्याने डिलीव्हरी बॉयचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला होता.
यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान बनवला. तीन दिवसांनंतर संधी मिळाल्यानंतर हेमंत याने डिलीव्हरी बॉयचा मृतदेह पोत्यात भरला. यानंतर मृतदेह असलेले हे पोत स्कूटीवर अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळील निर्जन भागात नेले. एक जागा निश्चित करून त्याने आपल्या स्कूटीतून मृतदेह काढून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
11 फेब्रुवारी रोजी अर्सिकेरे शहरातील अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळ, कर्नाटक पोलिसांना एक जळालेला मृतदेह आढळला होता. अशाप्रकारे रेल्वे स्थानकाजवळ जळालेला मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला. घटनेचे गांभीर्य पाहून अधिकाऱ्यांनी तत्काळ या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केले. तपासात जे खुलासे झाले त्यामुळे पोलीसही हैराण झाले आहेत.
हा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सर्व कॅमेऱ्यांचे CCTV फुटेज चेक केले. यावेळी एक तरुण संशयास्पद हालचाली करताना दिसला. यानंतर पोलिसांनी हेमंतला ताब्यात घेतले. पोलिस चौकशीत हेमंत दत्ताने सांगितले की, डिलिव्हरी बॉय हेमंत नाईकला देण्यासाठी त्याच्याकडे 46 हजार रुपये नव्हते. मात्र, त्याला आयफोनही पाहिजे होता. त्यामुळे त्याने डिलिव्हरी बॉयला मारण्याचा कट रचला.