रायगड जिल्ह्यात मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम प्रकल्प

कोकणातील रायगड जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या नवा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा उद्योग समुहाच्यावतीने उभा राहणार आहे.  

रायगड जिल्ह्यात मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम प्रकल्प
Pic Courtesy : @CMOMaharashtra, twitter

मुंबई : कोकणातील रायगड जिल्ह्यात पर्यटनदृष्ट्या नवा प्रकल्प महाराष्ट्र शासन आणि महिंद्रा उद्योग समुहाच्यावतीने उभा राहणार आहे. तसा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिंद्रा उद्योगाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्या उपस्थित करण्यात आला. 'मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम प्रकल्प' हा प्रकल्प मुरुड जंजिरा परिसरात उभा राहणार आहे. त्यामुळे राज्यासाठी हा महत्वाकांक्षी आणि पर्यटन उद्योगाला चालना देणारा प्रकल्प असणार आहे.

यांच्यात झाला सामंजस्य करार

राज्य शासन आणि महिंद्रा समूहासोबत 2 जानेवारी 2019 रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. त्यानंतर या करारांचे आदान-प्रदान करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणालेत, हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी आणि पर्यटकांना आकर्षित करणारा ठरेल. मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. वारसा स्थळ म्हणून मुरूड जजिंरा परिसराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामध्ये आता या नवीन पर्यटन प्रकल्पामुळे परिसरातील अनेक बाबींना चालना मिळणार आहे. 

काय असणार या प्रकल्पात?

मुरूड जजिंरा परिसराचा याआधी रायगड प्रादेशिक आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम या प्रकल्पाअंतर्गत हिल स्टेशन, फणसाड अभयारण्य, योग प्रशिक्षण, रोप-वे, स्थानिक हस्तकला बाजारपेठेचा विकास आणि निसर्ग पायवाट आदी पर्यटनदृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. 

तरुणांना मिळणार रोजगार

मुरूड-जजिंरा परिसराला मोठे महत्त्व आहे. त्यामध्ये आता या नवीन पर्यटन प्रकल्पामुळे परिसरातील अनेक बाबींना चालना मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना व्यावसायिक आणि रोजगारांच्या अनेक संधी मिळतील. तसेच या मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार प्रशिक्षण देणे आणि हे सर्व पर्यटन घटक इको-टुरिझम या संकल्पनेवर विकसित करण्याची संकल्पना आहे. यातून जवळपास सहा हजार स्थानिकांना रोजगार मिळणार आहे.

मुरुड - जंजिरा जलदुर्गाचा परिसर मेडिकल टुरिझम म्हणून करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पहिेले पाऊल टाकले आहे. आनंद महिंद्रा यांनी या संदर्भात एक ट्विट करुन आनंद व्यक्त केलाय. तसेच मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. महिंद्रा यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचे खास आभार मानले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनीही मेडिकल- हेल्थकेअर टुरिझम प्रकल्प करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर दिली आहे. मुरुड जंजिराचा परिसर महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडच्या माध्यमातून वैद्यकिय पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.