रत्नागिरीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळांचे वर्ग सुरू

शाळांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले

Updated: Apr 19, 2020, 12:49 PM IST
रत्नागिरीत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शाळांचे वर्ग सुरू title=

प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे आगामी काळात शिक्षण व्यवस्थेवर देखील काही प्रमाणात ताण येणार आहे. दरम्यान या साऱ्या परिस्थितीत रत्नागिरीतील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवले आहेत. याच माध्यमातून विद्यार्थ्यांना गृहपाठ देखील दिला जात आहे.

अगदी ऑनलाईन गेम  खेळण्यासाठी वापरण्यात येणारा मोबाईल असो किंवा लॅपटॉप, हे सारं विद्यार्थ्यांसाठी आता त्याचं दफ्तरच झालं आहे.

त्याच माध्यमातून विद्यार्थी सध्या लॉकडाऊनच्या काळात देखील अभ्यासाचे धडे गिरवताना दिसत आहेत. याकरता झूम एप किंवा व्हॉट्सअपची मदत घेतली जात असल्याचे श्रीपाद केळकर या पालकांनी सांगितले. 

रत्नागिरीमध्ये पोद्दार इंटरनॅशन सारखी सीबीएसई बोर्डाची शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत 'झूम' किंवा व्हॉट्सअपची मदत घेतली जात आहे.

या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे आणि गृहपाठ देखील दिला जात आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद देखील तितकाच उत्तम असल्याचे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक अभिजित कामेरकर यांनी सांगितले.  

लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्यानं अभ्यासक्रम पूर्ण करताना त्याचा परिणाम मात्र नक्कीच दिसून येतोय...पण, शक्य असेल त्या ठिकाणी यावर तंत्रज्ञानाची जोड घेत त्यावर काही  शाळांनी मात केल्याचं  त्याचा परिणाम दिसून येते.

अगदी घरी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप नसेल तरी मोबाईलच्या माध्यमातून देखील हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवला जातोय. पण विद्यार्थ्यांना शाळा आणि तो माहोल मात्र मिस करावा लागत असल्याचे विद्यार्थी सांगतात.

या साऱ्यांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा देखील कुठंच मागे नाहीत. या शाळांनी देखील व्हॉटसअपवर ग्रृप तयार करत विद्यार्थ्यांना गृहपाठ दिल्याचं दिसून येत आहे. या साऱ्या गोष्टी विद्यार्थ्यांना वेळच्यावेळेवर आणि अगदी रोज दिलं जाईल याची काळजी देखील शिक्षक घेत आहेत.

आपली जबाबदारी ओळखून या गोष्टी केल्या जात आहे. ग्रामीण भागात मात्र शिक्षण आणि विद्यार्थ्यांची कसरत लागली आहे. तंत्रज्ञानाची कनेक्टीव्हिटी नसल्यानं त्यांच्यापुढे मात्र काय करायचं? असाच प्रश्व पडला आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याचा परिणाम हा काही प्रमाणात का असेना अभ्यासक्रम पूर्ण करताना नक्कीच जाणवणार आहे. अगदी विविध बोर्डाच्या परिक्षा या एका ठराविक वेळेत पार पडत असल्यानं त्यांचं शेड्युल्ड देखील बिघडले आहे.

त्यावर तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं मार्ग काढण्याचा प्रयत्न यशस्वी होताना देखील दिसत आहे. विद्यार्थी, पालकांचा मिळणार प्रतिसाद देखील समाधनकारक असाच आहे. पण, मोबाईल, इंटरनेट कनेक्टीव्हिटी न मिळणाऱ्या भागात मात्र कसरतच आहे.