रत्नागिरीत ठेकेदाराच्याच कामगारांना 'शिवभोजन'चा लाभ

 उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत यातला घोटाळा उघड

Updated: Jan 27, 2020, 06:15 PM IST
रत्नागिरीत ठेकेदाराच्याच कामगारांना 'शिवभोजन'चा लाभ

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : १० रुपयात भरपेट जेवण देणाऱ्या शिवभोजन थाळीला प्रजासत्ताक दिनी सुरुवात झाली.राज्यात १२५ ठिकाणी, तर मुंबईत ४ ठिकाणी सुरुवात झाली. ७० ते १५० थाळ्या त्या त्या प्रभागात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू झाली आहे. पण उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीत यातला घोटाळा उघड झालाय. शिवभोजन थाळीचा बोगस लाभार्थी कसा फायदा घेतात ? हे इथे पाहायला मिळालं. 

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात चक्क ठेकेदाराचीच माणसं कुपन घेवून जेवत होती. त्यानंतर जेवण वाढायला आणि मेसमध्ये काम करायलाही तीच माणसं दिसत होती. 'झी २४ तास'नं हा सगळा प्रकार उघड केल्यावर अन्न नागरी पुरवठा विभागाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

नायर रुगणलाय, सायन रुग्णालय, केईएम आणि धारावी येथे ही सेवा सुरू झाली. मात्र आज नायर रुग्णालयात दुपारी बारा वाजताच थाळी संपली असं कँटीन चालकाने सांगितलं. १०० थाळ्यांचीच सोय असताना नागरिकांकडून मात्र दुप्पट प्रतिसाद मिळाला.

अगदीच लिमिटेड थाळी उपलब्ध असल्याने कितीतरी नागरिकांचा यामुळे हिरमोड झाला. दुपारी १ नंतर आलेल्या ग्राहकांना थाळी मिळालीच नाही. १० रुपयांची थाळी मिळेल, स्वस्तात जेवण होईल या आशेने लोक आले मात्र त्यांना थाळी संपली असा बोर्ड बघायला मिळाला. सरकारने थाळीची संख्या वाढवावी अशीच मागणी नागरिकांनी केली. 

सरकारने सुरू केलेल्या या योजनेत या उणीवा आढळून आल्या आहेत. शिवभोजन थाळीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा हिरमोड झाल्यानं सरकारचं कौतुक करावं का टीका अशीच परिस्थिती आहे. थाळीची संख्या वाढवल्यास ही योजना नक्कीच यशस्वी होईल असंच दिसतं आहे