Parenting Tips : ठाणे येथील कापुरबावडीतील सी.पी.गोएंका इंटरनॅशनल स्कूलमध्ये सहलीदरम्यान इयत्ता दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांचा बसमध्ये विनयभंग झाला. या प्रकरणानंतर अनेक पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. लहान मुलांना अशा चुकीच्या माणसांपासून कसं वाचवायचं तिथपासून ते मुलं शाळेतही सुरक्षित नाहीत तर कुठे सुरक्षित असे प्रश्न निर्माण होत आहे.
लहान वयातच मुलांना काही गोष्टी शिकवणे अत्यंत गरजेचे होत चालले आहे. यामध्ये मुलांना Good Touch आणि Bad Touch शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच मुलांनी कायम अलर्ट राहणं देखील तितकंच महत्त्वाचं होत चाललं आहे. अशावेळी लहान मुलांना त्यांच बालपण जपत या गोष्टी कशा शिकवाल हे सांगण्यासाठी झी चोवीस तासने झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी यांची प्रतिक्रिया घेतली. यावर डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचं आहे.
ठाण्यातील सी. पी. गोएंका इंटरनॅशनल स्कूलची सहल घाटकोपर येथील एका थीम पार्कमध्ये गेली होती. यामध्ये इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सहलीत सहभाग होतो. सहलीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना एका खासगी कंपनीच्या बसमधून नेण्यात आलं. यापैकी एका बसमध्ये जावेद खान अटेन्डन्ट म्हणून काम करत होता. या जावेदनं विद्यार्थ्यांना खाऊची पाकिटं देत असताना विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
डॉ. उर्वी महेश्वरी सांगतात की, मुलांचं बालपण जपत त्यांना गुड टच, बॅड टच शिकविणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मुलांची सुरक्षितता लक्षात येऊन त्यांना काही प्रमाणात अलर्ट करणं किंवा व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. मुलांना त्यांचे प्रायव्हेट पार्ट आणि त्याबद्दलची योग्य ती माहिती शाळा आणि पालकांनी देणे देखील तितकीच गरजेची आहे.
झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी म्हणाल्या की, वयानुसार मुलांमध्ये काही शारीरिक बदल होत असतात. या काळात दोन्ही पालकांनी मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या वयानुसार मुले आजकाल खूप हुशार होत आहेत. टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना खूप काही समजायला लागलं आहे. काही वेळा या सर्व माध्यमांतून चुकीची माहितीही त्यांच्यापर्यंत पोहचते. त्यामुळे मुलांच्या लैंगिक हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच त्यांना योग्य माहिती देणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांनी सर्वात आधी मुलांशी मैत्री केली पाहिजे. तसेच लैंगिक विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे.
(हे पण वाचा - Parenting Tips : संकोच नको, शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच मुलांना शिकवा गुड टच, बॅड टच!)
इंटरनेट, स्मार्ट फोन, सोशल मिडीया अशा इतर ठिकाणाहून मुलं चुकीची लैंगिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना पालकांनी स्वत: योग्य शब्दांत योग्य ते त्यांच्या वयानुसार योग्य ज्ञान पोहचवणं गरजेचं आहे. न लाजता किंवा अपराधीपणाची भावना न बाळगता पालकांनी आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. चांगला आणि वाईट स्पर्श या गोष्टी मुलांना व मुलींना या वयातच शिकवल्या पाहिजेत. लैंगिक शिक्षण शाळेबरोबरच घरातूनही मिळायला हवे. किशोरवयीन मुलांना त्या वयात होणाऱ्या शारीरीक बदलांविषयी माहिती दिली पाहिजे. हे शारीरिक बदल सामान्य आहेत हे मुलांना समजावून सांगा. याशिवाय लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कोणते वय योग्य आहे हे मुलांना शिकवा. या संदर्भात केलेल्या पोक्सो कायद्याची माहिती देऊन चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखले पाहिजे. मुलांना लैंगिक संक्रमित रोग, एचआयव्ही, एटीडी याविषयी शिक्षण दिले पाहिजे.