Relationship News : विज्ञान आणि तंत्रज्ञानानं गेल्या काही वर्षांमध्ये केलेली प्रगती आणि कैक मैल पुढे गेलेलं जग पाहताना आपलं आयुष्यही किती वेगानं बदलत आहे याचीच जाणीव होत आहे. मुळात हे बदल सकारात्मक असले तरीही त्याचे दूरगामी परिणाम मात्र फारसे सकारात्मक नाहीत हे आतापर्यंत अनेकांच्याच लक्षात आलं आहे ही वस्तुस्थिती. याच बदलांपैकी सर्वांच्या जीवनावर थोड्याफार प्रमाणात हस्तक्षेप करणारी एक संज्ञा म्हणजे 'फबिंग'.
‘फबिंग’ हा वर्तणुकीचाच एक असा प्रकार आहे ज्याचा आरोग्यावर आणि नात्यांवरही थेट परिणाम दिसून येत असल्यामुळं आता हा शब्द जरा गांभीर्यानं चर्चेत येताना दिसत आहे. फोन आणि स्नबिंग अशा दोन शब्दांना जोडून फबिंग हा शब्द तयार करण्यात आला आहे. तुमच्या समोर तुमचा जोडीदार, मित्र किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती बसलेली असतानाही त्या व्यक्तीशी थेट संवाद साधण्याऐवजी जर तुम्ही मोबाईलमध्येच डोकावत असाल, स्क्रोल करत असाल तर त्या कृतीला फबिंग असं म्हटलं जात आहे.
तुमच्या सामाजिक, भावनिक आणि मानसिक अशा तिन्ही स्थितींवर या फबिंगचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. ऑस्ट्रेलियातील एका जाहिरात कंपनीनं 2012 मध्ये या शब्दाचा प्रथमत: केला होता. अनेकदा मोबाईलच्या अतीवापरामुळं नात्यांकडे दुर्लक्ष होतं. तज्ज्ञांच्या मते सोशल मीडियावर सध्याच्या पिढीचा अधिकाधिक वेळ जात असल्यामुळं एकमेकांशी, एकमेकांच्या जीवनशैलीची तुलना करण्याचं प्रमाण यामुळं वाढत आहे.
फक्त आप्तेष्ठच नव्हे, तर एकाच खोलीत असणाऱ्या पती- पत्नीच्या नात्यावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. एकाच ठिकाणी, एकाच खोलीमध्ये असणारे पती- पत्नी तासन् तास एकमेकांशी संवाद साधत नाहीत, अनेकदा हा संवाद सोशल मीडियाशीच संबंधित एखाद्या विषयावर असतो, ज्याचं रुपांतर बऱ्याचदा वादात होतं. या साऱ्याचे थेट परिणाम नात्यांमध्ये येणाऱ्या दुराव्याच्या रुपात दिसत आहेत. जोडीदार किंवा आपल्या जीवनात महत्त्वं असणारी व्यक्ती समोर असतानाही त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद न साधता हातातल्या मोबाईलला जास्त प्राधान्य देणं ही अनादराची कृती मानली जात आहे.
फबिंग हे फोन सतत वापरण्याच्या व्यसनाचाच एक प्रकार असून, हा अतिरेक टाळण्यासाठी काही सोप्या कृती तुम्ही अवलंबात आणू शकता. जसं की...
नोटिफिकेशन बंद ठेवणं
स्मार्टफोनवर 24 तास इंटरनेटची उपलब्धता असल्यामुळं सतत इन्स्टाग्राम, व्हॉट्स अप, फेसबुक, ट्विटरवर नोटिफिकेशन येत असतात. एखाद्या दुसऱ्या अॅपचंही नोटीफिकेशन आपलं लक्ष वेधतं. अशा वेळी, ते नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्षणाचाही विलंब लावला जात नाही आणि मग मिनिटांचे तास झाले तरीही फोन काही हातचा सुटत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी नोटिफिकेशन बंद ठेवण्याचा पर्याय तुमची मदत करु शकतो.
फोनपासून दुरावा पत्करणं
कोणा व्यक्तीशी बोलताना, एखादी गोष्ट पाहताना, जेवताना फोन कायम दूर ठेवण्याची सवय स्वत:ला लावा. इथं तुम्ही स्वत:वर नेमकं किती नियंत्रण आहे याचं परीक्षणही करू शकता.
नो फोन झोन
नात्यांमध्ये आलेला दुरावा फोनमुळं असेल तर, काही नियम आखून त्यांचं पालन तातडीनं करायला लागा. घरामध्ये अमुक वेळात, अमुक खोलीमध्ये फोन वापरणार नाही, असं स्वत:ला सातत्यानं सांगा आणि तशी सवय लावा. वाचन, लेखन, संवाद साधणं अशा सवयींना केंद्रस्थानी आणा जेणेकरून याचे सकारात्मक परिणाम तुमच्या नातेसंबंधांमध्ये दिसून येतील. फबिंग ही समस्या वरवर फार गंभीर वाटत नसली तरीही तिचे परिणाम मात्र अतिशय गंभीर आहेत. त्यामुळं तुमच्यामध्ये किंवा जोडीदारामध्ये अशी लक्षणं दिसल्यास काही सवयींनी या समस्येपासून दूर राहा. फायदा तुमचाच!