सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मोठ्या पदावर काम करणारे अधिकारी, सेलेब्रिटी असो वडापावचं नाव घेतल्यावर कोणलाही खाण्याचा मोह आवरत नाही. मुंबई आणि वडापाव हे समीकरण जगातभारी आहे. परदेशातून मुंबईत येणारा व्यक्ती वडापाव खाल्या शिवाय परत जात नाही. मुबंईच्या रस्त्यांवर वडापाव खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. हा वडापाव अनेकांसाठी रोजचे जेवण आहे. कोणी याला नाष्टा म्हणून खातं तर कोणी वडापाव खाऊन आपली भूक भागवतं. मुंबईची लोकल आणि वडापाव हे सर्वत्र प्रसिद्ध आहे. वडापावला केवळ मुंबई, महाराष्ट्रातंच नव्हे तर भारता बाहेरही चांगलीच मागणी आहे. ही लोकप्रियता बघून परदेशातही वडापाव विकणारे हॉटेल्स सुरू झाले आहेत.
या वडापावच्या नावाने अनेक जागा, व्यक्ती प्रसिद्ध होताना दिसत आहेत. दिल्लीत वडापाव विकणारी सोशल मीडियावर वडापाव गर्ल नावानं प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षितनं वडापाव विकत जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉस ओटीटी ३ शोमध्ये ती स्पर्धक म्हणून झळकली होती. आज ती वडापाव विक्री करून रोज ४० हजार रुपये कमविते.
वडापावचा जन्म-
1966 साली अशोक वैद्य यांनी स्टेशनच्या बाहेर वडापावचा शोध लावला. दादर त्यानंतर दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंनी वडापाव विकायला सुरुवात केली. बटाट्याच्या भाजी बरोबर पोळी खाण्यापेक्षा, बटाट्याच्या भाजीचा गोळा करून तो बेसनाच्या पिठात घोळवून पावात घालून वडापाव तयार करण्यात आला. तेव्हा पासून धावपळीच्या जीवनात खाण्यास सोईस्कर, व्यस्त आणि चवीला मस्त असणारा हा वडापाव मुंबईकरांना जवळचा वाटू लागला. त्यावेळी एका वडापावची किंमत फक्त 10 पैसे होती. आज वडापाव 10 रूपयांपासून ते मॉलमध्ये 100 रूपये आणि मोठ्या हॉटेल्स मध्ये तर अगदी 500 ते 1000 रूपयांपर्यंतही मिळतो.
वडापावचा इतिहास-
वडापावला खरी लोकप्रियता मिळाली ती दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे. पण 1970 ते 1980 च्या आसपासच्या काळात मुंबईमध्ये असणाऱ्या या मिल बंद झाल्या. त्यानंतर रोजगाराचे साधन म्हणून अनेकांनी वडापावच्या गाड्या सुरु केल्या. आणि दादरमध्ये सुरू झालेला हा वडापाव मुंबईच्या गल्लीगल्लीत दिसू लागला. या काळात दक्षिण भारतीयांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन छेडले होते. म्हणून अनेक शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. आज वेगवेगळ्या ठिकाणी वडापाव वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो.
प्रसिद्ध ठिकाणे-
मुंबईमत कीर्ती कॉलेज जवळचा अशोक वडापाव, श्रीकृष्ण छबीलदास, शिवाजी वडापाव, ग्रॅज्युअट वडापाव, गजानन वडापाव, धीरज वडापाव, खिडकी वडापाव, आनंद वडापाव, जम्बो किंग वडा पाव, सम्राट वडापाव आणि सीएसटीसमोरील आराम वडापाव ही ठिकाणे वडापावसाठी प्रसिद्ध आहेत.