Mahavitaran Strike Latest News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम आहेत.
4 Jan 2023, 15:16 वाजता
संपामुळे हॉस्पिटलमध्ये उडाली तारांबळ, जनरेटरचा घेतला आधार
Mahavitaran Strike News : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेला संपामुळे तारांबळ उठली आहे. रुग्णांची आणि नातेवाईकांची धावपळ होताना पाहायला मिळत आहे. अचानक लाईट गेल्यामुळे आता ग्रामीण रुग्णालयांमध्ये जनरेटरवर सुरु करण्यात आलेले आहेत. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये अशीच अवस्था पाहायला मिळाली आहे. जनरेट सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
4 Jan 2023, 14:59 वाजता
संपामुळे वाशिम जिल्ह्यातील 43 गावे अंधारात
Mahavitaran Strike News : वाशिम जिल्ह्यातील वाशिम,राजगांव आणि अमानी हे 3 वीज उपकेंद्र सकाळ पासून बंद पडल्याने जिल्ह्यातील 43 गांव अंधारात गेले आहेत. विजे अभावी अनेकांना अडचणींचा सामना करवा लागत आहे. विजेवर चालणारे काम ठप्प झाली आहेत.
4 Jan 2023, 14:57 वाजता
ठाण्यात संपाचे पडसाद, रुग्णालयांना व्हेंटिलेशनचा त्रास
Mahavitaran Strike News : रात्री 12 वाजल्यापासून वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद ठाण्यात उमटायला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा ठप्प झाल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या अनेक तासांपासून वीज खंडीत झाल्याने शहरातील दुकानदार, व्यावसायिक, रुग्णलये यांना समस्या निर्माण झाल्या आहेत. खास करुन वीज खंडीत झाल्याने रुग्णालयांना व्हेंटिलेशनचा (Ventilation) त्रास होत असून इस्त्रीचे दुकान, डेअरी व्यावसायिक, झेरॉक्सचे दुकानदार यांना त्रास सहन करावा लागत आहे.
4 Jan 2023, 14:55 वाजता
संपामुळे धाराशिव जिल्ह्यात विद्युत पुरवठा विस्कळीत
Mahavitaran Strike News : संपामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बत्ती गुल झाली आहे. 10 विद्युत पुरवठा उपकेंद्र बंद असून 100 पेक्षा अधिक गावात वीज खंडीत आहे. वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागाचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला आहे. धाराशिव शहरातील निम्म्या भागाची लाईट सध्या बंद आहे. धाराशिव शहरातील शिवाजी चौक ,सेंट्रल बिल्डिंग, शांतिनिकेतन ,पोस्ट कॉलनी ,रामनगर ,शाहूनगर आणि एमआयडीसी मधील विद्युत पुरवठा सध्या खंडीत आहे. भूम परंडा ,वाशी ,कळंब,धाराशिव व लोहारा तालुक्यातील जवळपास 50 गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा विद्युत पुरवठा रात्रीपर्यंत सुरळीत झाला नाही तर ही परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची चिन्ह आहेत.
4 Jan 2023, 13:44 वाजता
संपकरी कर्मचाऱ्यांना अखेर मेस्मा लावला
Mahavitaran Strike Latest News : राज्यभरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. आता वीज कर्मचाऱ्यांना इशारा देऊनही आंदोलन मागे न घेतल्याने राज्य सरकारने मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला आहे. सरकारने हा कायदा लागू केल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
4 Jan 2023, 13:17 वाजता
नाशिकमधील सीएनजी पंप बंद
Mahavitaran Strike News : वीजपुरवठा अभावी नाशिकमध्ये शहरात सीएनजी पंप बंद पडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजीचा पुरवठा नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. बहुतांशी सीएनजी पंप बंद असून
नाशिककरांना सीएनजीसाठी वणवण करावी लागत आहे.
4 Jan 2023, 12:46 वाजता
राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मिती
Mahavitaran Strike News : महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यात केवळ 6 हजार मेगावॅट वीजनिर्मितीच सुरु आहे. या संपाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागात बसला आहे. औद्योगिक वसाहतीतही काम बंद झाले आहे. दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्याता आला आहे. तर दुसरीकडे संप आजच मिटेल, असा विश्वास महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आहे.
4 Jan 2023, 12:08 वाजता
महावितरणचे कर्मचारी आक्रमक, अदानी गो बॅक....च्या घोषणा
महावितरण कर्मचा-यांच्या संपामुळे राज्यातले अनेक वीज प्रकल्प बंद पडले आहेत. याचा ग्रामीण भागात मोठा फटका बसला आहे. औद्योगिक वसाहतीतही काम बंद पडले आहे. दरम्यान, राज्यभरातील वीज कर्मचाऱ्यांच्या संपात नागपुरातील वीज कर्मचारी संविधान चौकात एकत्र येऊन सरकरविरोधात घोषणाबाजी केली. अदानी गो बॅक..... वीज उद्योगाचे खासगीकरण बंद करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
4 Jan 2023, 11:13 वाजता
नाशिकमध्ये एकलहरा वीज निर्मिती केंद्रावर आंदोलन
Mahavitaran Strike News : नाशिकच्या एकलहरा वीज निर्मिती केंद्रावर आंदोलन सुरु आहे. अदानीविरोधात वीज कर्मचारी संपावर गेलेत. संपामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका नाशिकमध्येही बसताना दिसतोय. रात्रीपासून अनेक भागात बत्ती गुल झालीय. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
4 Jan 2023, 11:12 वाजता
पुणेकरांना मोठा मनस्ताप, मोबाईल चार्ज होत नाही तर गिझर बंद
Mahavitaran Strike News : वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. धायरी, कात्रज, शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झालीय. रात्रीपासूनच वीजपुरवठा खंडीत असल्याचा फटका कामावर जाणाऱ्यांना बसला आहे. मोबाईल चार्ज होत नाहीएत, तर गिझर बंद असल्यानं गॅसवर पाणी तापवण्याची वेळ आलीय. बत्ती गुल असल्याचा मनस्ताप पुणेकरांना सहन करावा लागत आहे.