Mahavitaran Strike Latest News : राज्यभरातील बत्ती आजपासून गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी ठाम आहेत.
4 Jan 2023, 11:08 वाजता
राज्यभर कर्मचारी आक्रमक, मध्य प्रदेश वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांना विरोध
Mahavitaran Strike News : नागपूर, वाशिम, यवतमाळमध्येही वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. नागपुरात मध्य प्रदेश वीज मंडळाचे कर्मचारी कोरडी पॉवर स्टेशनला दाखल होत असताना राज्य वीज कर्मचाऱ्यांनी त्यांना जोरदार विरोध करताना घोषणाबाजी केली. वाशिम जिल्ह्यातील 600 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. रात्री पासून हा संप सुरू करण्यात आलाय. वाशिमच्या वीज कर्मचा-यांनी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करत खासगीकरणाचा विरोध केला. तर यवतमाळमध्ये महावितरण कर्मचा-यांच्या 72 तासांच्या संपाला सुरुवात झाली आहे. अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने विज वितरणासाठी परवानगी मागितल्यानं राज्यभर कर्मचारी आक्रमक झालेत.
4 Jan 2023, 11:07 वाजता
पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी संपावर
Mahavitaran Strike News : अकोला जिल्ह्यातील पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी संपावर गेलेत. त्याचा फटका वीज निर्मितीला बसतोय. प्रकल्पातील 250 मेगावॅट क्षमतेचं एक युनिट बंद पडलंय. संपक-यांनी हे युनिट बंद पाडल्याचा दावा करत असले तरी काही दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे ते बंद असल्याचं प्रकल्प अधिका-यांनी सांगितलंय. या प्रकल्पात 500 मेगावॅट वीज निर्मिती होते. पारस महाऔष्णिक वीज केंद्रातील 560 पैकी 540 कर्मचारी संपात सामील झालेत
4 Jan 2023, 10:18 वाजता
नागपूर जिल्ह्यातील तीन संच संपामुळे बंद
Mahavitaran Strike News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पॅावर प्लांट येथील तीन संच संपामुळे बंद आहेत. खापरखेडा पॅावर प्लांट येथील युनीट 2, 3 आणि 4 बंद असल्याने विद्युत पुरवठ्यावर याचा परिणाम झालाय. खापरखेडा पॅावर प्लांट येथील 95 टक्के कर्मचारी संपावर आहेत. संपामुळे खापरखेडा पॅावर प्लांट येथील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
4 Jan 2023, 10:11 वाजता
वैजापूर तालुक्यात काही भागात रात्रीपासून वीज गायब
Mahavitaran Strike News : संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात काही भागात रात्रीपासून वीज नाहीए. तर गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव, लासुर स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसरातही रात्रीपासून वीज गेली आहे.. संपामुळे कर्मचारी कामावर नाहीएत, त्यामुळे वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला आहे.
4 Jan 2023, 10:10 वाजता
भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून लाईट बंद
Mahavitaran Strike News : भंडारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून लाईट बंद आहे. लाईट नसल्यानं नागरिकांची सकाळची कामं खोळंबलीत..लाखांदूरमध्ये पहाटेपासून वीजपुरवठा खंडीत आहेत. अदानीविरोधात वीज कर्मचारी संपावर आहेत मात्र त्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागतोय.
4 Jan 2023, 10:08 वाजता
पनवेल येथील इंडिया बुल्स परिसरात वीज पुरवठा खंडीत
Mahavitaran Strike News : नवी मुंबई जवळील पनवेल येथील इंडिया बुल्स परिसरात मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. इतर भागात वीज पुरवठा सुरळीत आहे. उरण शहर काही भागात पहाटे 5 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान, नवी मुंबईमध्ये मात्र वीजपुरवठा सुरळीत आहे. तरऔद्योगिक वसाहतीमध्येही वीज पुरवठा सुरळीत आहे.
4 Jan 2023, 09:26 वाजता
रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल
Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात बत्ती गुल झाली आहे. रत्नागिरी शहर वगळता राजपूर, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड या तालुक्यातील वीज गेली आहे. त्यामुळे अनेक व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.
4 Jan 2023, 09:24 वाजता
संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका
Mahavitaran Strike News : राज्यातील वीज कर्मचारी संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांअभावी कोयना प्रकल्पातील 36 मेगावॅटचे एक युनिट बंद आहे. कोयना धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातील 35 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पातीलही कर्मचारी संपामुळे कामावर आलेले नाहीत. कर्मचारी संपामुळे कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम होवू शकतो
4 Jan 2023, 09:22 वाजता
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका
Mahavitaran Strike News : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीला फटका बसला आहे. 210 मेगावॅट क्षमतेचं युनिट 4 आणि 500 मेगावॅट क्षमतेचं युनिट 5 पडले बंद, युनिट 4 मध्ये एअर हीटर ची समस्या उदभवली आहे तर युनिट 5 मध्ये कोळशाची राख बाहेर निघण्याच्या प्रक्रियेत बिघाड आल्याने दोन्ही युनिट कऱण्यात आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील 2500 कर्मचारी संपात सहभागी झालेत.
4 Jan 2023, 08:24 वाजता
संपाचा ग्रामीण भागातही मोठा फटका
Mahavitaran Strike News : वीज कर्मचारी संपावर गेल्याचा फटका राज्यातल्या ग्रामीण भागातही बसत आहे. साताऱ्याच्या ग्रामीण भागातही बत्ती गुल झाली आहे. आधीच ग्रामीण भागात लोडशेडिंगचं संकट असतं. त्यात आता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचारीच उपलब्ध नाहीत. तसंच वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो पुर्ववत करणार नसल्याचं पत्रकही संपकरी वीज कर्मचा-यांनी काढलंय. तेव्हा ग्रामीण भागातला वीजपुरवठा कधी पुर्ववत होणार हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.