Woman Suffers Burn Marks: त्वचेची काळजी घेण्यासाठी तरुणींसह महिलाही ब्युटी पार्लर (Beauty Salon Andheri) गाठतात. पण अनेकदा पार्लरमध्ये केल्या गेलेल्या ट्रिटमेंटचा त्वचेवर उलटाच परिणाम होतो. मुंबईतील एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. 17,500 रुपये खर्चून महिलेने एका ब्युटी पार्लरमधून फेशिअल केले होते. मात्र, या फेशिअलमुळं (Hydra Facial) तिचा चेहरा खराब झाला आहे. या घटनेनंतर महिलेने संबंधित ब्युटी पार्लरविरोधात तक्रार दाखल केली आहे.
17 जून रोजी हा प्रकार घडला आहे. अंधेरीतील कामधेनु शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या ग्लो लक्स सॅलोनमध्ये ब्युटी ट्रिटमेंटसाठी अपॉइमेंट बुक केली होती. त्यात हायड्रा फेशिअलसुद्धा तिने निवडले होते. या सर्व ब्युटी ट्रिटमेंटची किंमत 17,500 रुपये होते. फेशिअल करत असताना पार्लरमधील एका कर्मचारीने तिच्या चेहऱ्यावर एक क्रिम लावली. त्याक्षणीच महिलेला तिच्या चेहऱ्यावर जळजळ जाणवली. तिने तिथल्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मात्र त्यांनी ही अॅलर्जीची रिअॅक्शन असू शकते, असं सांगून तिचं समाधान केले.
चेहऱ्याची जळजळ कमी होत नसल्याने तसंच, चेहऱ्यावर काळे चट्टे उठल्याने महिलेने पुन्हा कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. तेव्हा त्यांनी काही जणांना या क्रीमची अॅलर्जी असते त्यामुळं असे चट्टे उठले असतील. पण दोन-दिवसात हे चट्टे निघून जातील तसंच, व्रणही चेहऱ्यावर दिसणार नाहीत, असं सांगून तिला अश्वस्त केले.
या मुद्द्यावरुन महिलेचे ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांशी भांडण झाले. शेवटी वाद इतका वाढला की तिथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तेव्हा पार्लरमधील कर्मचाऱ्यांनी महिलेला चेहऱ्यावरील खुणा कमी होण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महिलेने त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला. तसंच, कूपर रुग्णालयातील डॉक्टरांचीही भेट घेतली. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी लेखी स्वरुपात अहवाल दिला आहे. महिलेच्या चेहऱ्यावर असलेले व्रण हे कायमस्वरुपी आहेत. निकृष्ट प्रोडक्ट वापरल्याने किंवा चुकीच्या प्रमाणात प्रोडक्ट वापरल्याने त्याची रिअॅक्शन महिलेच्या चेहऱ्यावर उमटली आहे. त्यामुळं तिच्या चेहऱ्यावर जळजळ होऊन त्याचे व्रण उमटले आहेत.
दरम्यान संबंधित महिलेला मनसे नेते प्रशांत राणे यांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. राणे यांनींची या घटनेची माहिती त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली होती. मात्र काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट केले आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात ब्युटी पार्लरच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.