Children's Day, जालना : मूर्ती लहान पण किर्ती महान या म्हणीला साजेशी अशी कामगिरी जालना(Jalna) येथील सावन बारवाल या 11 वर्षाच्या मुलाने केली आहे. सावन याने आपल्या जीवाची बाजी लावत विहीरीत बुडणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीचे प्राण वाचवले आहेत. सावनच्या या धाडसाचे केवळ गावातच नाही तर संपूर्ण राज्यभरात कौतुक होत आहे. थेट शौर्य पुरस्कारासाठी(child bravery award) सावनच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. आज सर्वत्र बालदिन(Children's Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच सावनने केलेली कामगिरी इतर मुलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आणि आदर्श अशी ठरणारी आहे.
सावन जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील लालवाडी गावात राहतो. गावात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच तो शिक्षण घेत आहेत. आज बालदिनानिमित्ताने सावन याच्या धाडसाचे विशेष गौरव करण्यात आला.
29 सप्टेंबर 2022 रोजी सावनने दाखवलेल्या धाडसामुळे दहा वर्षीय मुलीचे प्राण वाचले आहेत. गौरी भिमसिंग बारवाल असे या मुलीचे नाव आहे. गौरी इयत्ता चौथीत शिकत आहे.
सावन आणि गौरी दोघेही एकाच गावात राहतात. 29 सप्टेंबर रोजी गौरी सावन याची बहीण भाग्यश्री सह त्यांच्यात शेतात असलेल्या विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. सावन यांच्या शेतात असलेली ही विहीर तब्बल 35 फूट खोल आणि अत्यंत खडकाळ अशी आहे.
गौरी आणि भाग्यश्री दोघीही या विहीरीवर पाणी भरत होत्या. यावेळी पाणी भरताना गौरीचा तोल जाऊन ती विहिरीत पडली. गौरीला विहीरीत पडल्याचे पाहून भाग्यश्री भयभित झाली. तिने जोराने आरडाओरडा करत घरी धाव घेतली. यावेळी सावन घरी एकटाच होता. क्षणाचाही विलंब न करता सावन थेट विहीरीकडे धावत सुटला आणि त्याने विहीरीत उडी घेतली.
मोठ्या धाडसाने सावन याने गौरीला विहिरीच्या कडेला आणले. यानंतर ग्रामस्थांनी दोघांना विहीरीबाहेर काढले. सावनच्या धाडसामुळे गौरीचा जीव वाचला आहे. सावनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.