'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात'

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी. ठाकरे गटातील आमदारा आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. 

Updated: Apr 27, 2023, 12:00 PM IST
'ठाकरे गटातील 13 आणि राष्ट्रवादीचे 20 आमदार तर काँग्रेसचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात' title=

Uday Samant on Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात काय होईल, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. रोज वेगवेगळ्या राजकीय चर्चा झडत आहेत. आता तर ठाकरे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीमधील आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. तशी चर्चा आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगत असताना उदय सामंत यांनी नव्या चर्चेबाबत विधान केल्याने येत्या काळात राज्यात मोठी राजकीय घडामोड घडणार अशी चर्चा रंगली आहे. 

 नवी मुंबईतील खारघर येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवले जाईल अशी चर्चा आहे. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अशा अनेक चर्चा असल्याचे सांगत ठाकरे सेनेतील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत अशा अनेक चर्चा सुरु आहेत, असे वक्तव्य केले आहे. 

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर भाजपमधील वरिष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच शिंदे यांना सोबत घेऊनही भाजपला काहीही फायदा होणार नाही, अशी बाब लक्षात आली आहे. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना सहानभुतीचा लाभ मिळणार आहे. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला जमतेम 20 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसे भाजपच्या सर्व्हेत पुढे आले. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर भाजपला लाभ होणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर 
शिंदे गटाच्या नाराज आमदारांसाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे खुले केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिंदे गट अवस्थ आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सूचक विधान केले आहे. पक्ष सोडून गेलेले कुणी परत येणार असतील तर त्याबाबतचा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ घेतील. निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंतच्या काळात काहीही घडू शकते, असे सूचक विधान त्यांनी केलेय. त्यानंतर उदय सामंत यांनी अशा अनेक चर्चा आहेत, असे विधान केले आहे. महाबळेश्वरमध्ये काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले, अशीही चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या सत्यात उरल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.