पुण्यात हेल्मेटसक्तीचे १५० दिवस, ४५ कोटींचा दंड वसूल

पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली.

Updated: Jun 12, 2019, 06:55 PM IST
पुण्यात हेल्मेटसक्तीचे १५० दिवस, ४५ कोटींचा दंड वसूल title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यात एक जानेवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली. पोलीस आयुक्तांसह संपूर्ण वाहतूक विभाग रस्त्यावर उतरून कारवाई करतो आहे. त्याचा परिणाम दंडाच्या रकमेत दिसू लागला आहे. पुण्यात हेल्मेटसक्तीला १५० दिवस पूर्ण झाले असून या दरम्यान चार लाख वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत ४५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पुण्यात हेल्मेटसक्ती लागू झाल्यानंतर या हेल्मेट सक्तीला सर्वपक्षीय पुणेकरांनी विरोध केला. आंदोलनं झाली, मोर्चे काढले. पोलीस मात्र हेल्मेट सक्तीवर ठाम राहिले. हेल्मेटमुळं अपघाताचं प्रमाणही कमी झालं आहे. तसंच, हेल्मेट घालणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे, असा पोलिसांचा दावा आहे. 

दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त पुणेकरांमध्ये पोलिसांच्या या कारवाईमुळे नाराजी आहे. ड्रेनेजचे खड्डे, अरुंद, खराब रस्ते, चुकीचे गतिरोधक असलेले रस्ते हे सगळे दिव्य रोज का सहन करायचं, असा त्यांचा सवाल आहे.

हेल्मेटसक्तीला सहा महिने झाले. पण अजूनही चौकाचौकात हेल्मेटसक्तीवरुन पुणेकर आणि पोलिसांची रोज हुज्जत सुरू असते. त्यामुळे कारवाईबरोबरच आक्रमक प्रबोधन करण्याची गरज आहे.