VIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत; ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक

Mumbai Trans Harbour Link: मुंबईतील बहुप्रतीक्षीत असा मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) लवकरच प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलाची पहिली झलक पाहायला मिळतेय.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 17, 2023, 10:33 AM IST
VIDEO: देशातील सर्वात लांब सागरी पूल मुंबईत;  ट्रान्सहार्बर लिंकची पहिली झलक  title=
1st Video Capturing Glimpse Of The 21.8 Km-Long Mumbai Trans Harbour Link

Mumbai Trans Harbour Link Video: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. नव्या वर्षात या पुलावरुन नागरिकांना प्रवास करणे शक्य आहे. महत्त्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पामुळं मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. 23 किमी लांबीच्या या प्रकल्पाची पहिली झलक आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 

शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गामुळं दोन शहरांना जोडता येणार आहे. या पुलामुळं मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत तुम्ही सागरी मार्गाची पहिली झलक पाहू शकता. एका धावत्या कारमधून हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. यात दोन्ही कडील रस्ता पूर्णपणे मोकळा असून एकीकडे मुंबईतील उंचच बिल्डिंग आणि झगमाट पाहायला मिळतो. तर, थोडे पुढे गेल्यावर कारचा स्पीड कमी झालेला पाहायला मिळतो. 

कारचा वेग कमी झाल्यावर तुम्ही पाहू शकता की पुलावर अद्यापही काम सुरू आहे. काही कामगार काम करताना दिसत आहे. तर, एकीकडे उंचच उंच इमारतीच्या मागे सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे. पुलावरुनच मुंबईचे एक सुरेख व मनमोहक दृश्य पाहायला मिळतेय. जणू काही आपण विदेशातच असल्याचा भास होतोय. या व्हिडिओवर मुंबईकरांनी कमेंट केल्या आहेत. आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, असं अनेकांनी म्हटलं आहे. तर, एका युजरने ट्रान्सहार्बर लिंकचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. या फोटोत समुद्रात असलेला या सागरी मार्ग प्रकाशात लखलखताना दिसत आहे.

कसा असेल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प?

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळं मुंबईतील वाहतुक कोंडी फुटणार आहे. यापुलामुळं मुंबई ते नवी मुंबई प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर येणार आहे. तसंच, मुंबई ते पुणे अंतर 90 मिनिटांत गाठता येणार आहे. पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिरलेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे.

कधी सुरू होणार

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे उद्घाटन अटलबिहारी वाजपेयी जयंतीच्या दिवशी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी करण्यात येणार अशी माहिती होती. मात्र, तूर्तास तरी हे शक्य नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतेय. पुलाचे संपूर्ण काम जानेवारी 31 पर्यंत पूर्ण होईल त्यानंतर पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.