बापरे... रस्त्यावर दिसलं चक्क 22 किलोचं दुर्मिळ कासव

दुर्मिळ कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. 

Updated: Jul 1, 2021, 10:12 AM IST
बापरे... रस्त्यावर दिसलं चक्क 22 किलोचं दुर्मिळ कासव title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : राज्याच्या उपराजधानीत पंधरादिवसांपूर्वी एका बिबट्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा परिसरात चक्क रस्त्यावर एक दुर्मिळ कासव दुडूदुडू जाताना आढळून आला. तब्बल 22 किलोंचं हे कासव दक्षिण भारतात आढणा-या दुर्मिळ प्रजातींपैकी एक आहे. या कासवाला आता सेमिनरी हिल्स येथील ट्रान्झीट सेंटरला पाठवण्यात आलं आहे.  या दुर्मिळ कासवाची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. सध्या परिसरात  फक्त आणि फक्त याच कासवाची चर्चा आहे. 

नागपूर हिंगणा परिसरातील सूरजनगर रायपूर येथील रस्त्यावर एक दुर्मिळ कासव मंगळवारी रात्री नागरिकांना आढळून आलं. दुर्मिळ असं हे मोठं कासव रसत्यावर चालताना पाहून नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला. हिंगणा वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे यांना माहिती देण्यात आली. निनावे त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी ते कासव ताब्यात घेतलं.

त्यानंतर त्याला सेमिनरी हिल्स येथील ट्रान्फिट ट्रिटमेंट सेंटरला घेवून गेले..तिथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पशुपर्यवेशक सित्रांत मोरे यांनी राज्य वन्यजीव मंडळ सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाची तपासणी केली. हा कासव जलचर असून त्याचे नाव ‘लेथ्स सॉफ्टशेल टर्टल’ असे आहे. 

हा कासव दुर्मिळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. कासवाचे वजन 22 किलो 200 ग्रॅम असून लांबी 83 सेंटिमीटर आणि रुंदी 51 सेंटिमीटर आहे. त्याची तपासणी करून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर या दुर्मिळ कासवाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.

महत्वाच म्हणजे नागपूर शहरात वन्य प्राण्यांचा वावर असल्याचं गेल्या काही वर्षात सातत्यानं दिसून येत आहे. मात्र प्रामुख्यानं पाण्यात दिसणारा दुर्मिळ असा कासव नागपुरातील रस्त्यावर दुडुदुडू धावताना पाहून अनेक नागरिक कुतूहलानं यावेळी थांबले होते...