न्यायालयातील लिफ्ट मध्येच बंद पडल्याने ३ महिला वकील बेशुद्ध

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयातील घटना.

Updated: Jun 11, 2019, 07:21 PM IST
न्यायालयातील लिफ्ट मध्येच बंद पडल्याने ३ महिला वकील बेशुद्ध title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : लिफ्टमध्ये अडकल्याने तीन महिला वकील बेशुद्ध झाल्याची घटना आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात घडली. सुधा सहारे, आफरीन आणि शाहीन शाहा असे लिफ्ट मध्ये अडकलेल्या महिला वकिलांची नावे आहेत. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या मध्यवर्ती भागातील लिफ्टमध्ये या तीन महिला वकील आणि इतर चार ते पाच जण खाली उतरत होते. तेवढ्यात अचानक वीज प्रवाह खंडित झाल्याने लिफ्ट पाचव्या माळ्यावर अडकली. लिफ्टला अतिरिक्त वीज पुरवठ्याची सोय नसल्याने लिफ्ट पाचव्या माळ्याच्या मध्ये तशीच अडकून राहिली. 

लिफ्ट दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर लिफ्टमधून सर्वांना बाहेर काढले. मात्र तेवढ्या वेळात गुदमरल्या सारखी परिस्थिती झाल्याने तीनही महिला वकील बेशुद्ध झाल्या. सहकारी वकील आणि पोलिसांनी या तीनही महिला वकिलांना उपचारासाठी लगेच खाजगी रुग्णालयात दाखल केले. तीनही महिला वकिलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीत एकूण ८ लिफ्ट आहेत. मात्र त्यापैकी एकही लिफ्टला वीज प्रवाह खंडित झाल्यावर अतिरिक्त वीज पुरवठ्याची सोय नाही. न्यायालयात सुमारे ४ हजार वकील कार्य करतात, तर सुमारे ७ ते ८ हजारावर लोक न्यायालयात येतात. अशा परिस्थितीत काही अनुचित घडल्यास वैद्यकीय सोय उपलब्ध नाही. 

न्यायालय प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप वकील संघटनेने केला आहे. त्यामुळे अशी परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय सोय उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बार काऊन्सिलचे अध्यक्ष कमल सतुजा यांनी केली आहे.