आदिवासी आश्रम शाळांमधील 333 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालघरमधील धक्कादायक घटना

आदिवासी आश्रम शाळांमधील 333 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.  पालघर मधील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळांत हा  धक्कादायक प्रकार घडला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 7, 2024, 06:38 PM IST
आदिवासी आश्रम शाळांमधील 333 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालघरमधील धक्कादायक घटना title=

Palghar News : आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आदिवासी आश्रम शाळांमधील 333 विद्यार्थ्यांना विषबाधा  झाली आहे. पालघर मधील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळांत हा संतापजनक प्रकार घडला आहे. 

या आश्रमशाळेत शिकणाऱ्या 333 विद्यार्थ्यांना काल विषबाधा झाली आहे. या विद्यार्थ्यांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले.  दरम्यान, काल रात्री उशिरा काही विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात मत आले. मात्र, अजूनही दीडशे विद्यार्थ्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आज अचानक डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या बोईसर येथील सेंट्रल किचनला भेट देत जेवणाची पाहणी केली . तसंच यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत बसून जेवण देखील केलं असून चपात्या कच्च्या असल्याने प्रकाश निकम यांनी या सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. एकाच ठिकाणी सेंट्रल किचन असल्याने जेवण वाहतूक करण्यास बराच वेळ जातो त्यामुळे असे प्रकार घडत असल्याच सांगत प्रत्येक तालुका निहाय सेंट्रल किचन आदिवासी विकास प्रकल्पाने तयार कराव अशी मागणी देखील आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती यावेळी प्रकाश निकम यांनी दिली.

विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास 

पालघरच्या डहाणू तालुक्यातील धरमपूर ग्रामपंचायत हद्दीतील भोवाडी - कोसेसरी सह परिसरातील आठ ते दहा गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांची नदीतून ने-आण करणारा सूर्या नदीतील लाकडी तराफा मागील आठवडाभरापासून बंद आहे . सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाखाली सूर्या नदीवर कोसेसरी आणि सोलशेत या दोन गावांना जोडणारा पूल नसल्याने येथील नागरिकांसह विद्यार्थ्यांना ये - जा करण्यासाठी लाकडी तराफ्याची सुविधा करण्यात आली आहे . भोवाडी कोसेसरी सह परिसरातील आठ ते दहा गाव पाड्यांचे विद्यार्थी हे याच तराफ्याच्या आधारावर शिक्षणासाठी शाळा आणि महाविद्यालय गाठतात . मात्र सध्या पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीला पूर आल्याने हा लाकडी तराफा बंद ठेवण्यात आला आहे . त्यामुळे मागील आठ दिवसांपासून या  परिसरातील विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यापासून वंचित राहिले असून यामुळे त्यांच मोठ शैक्षणिक नुकसान होत असल्याचं सांगत पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .