प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : आंब्याला फळांचा (hapus mango) राजा का म्हणतात याचं ताजं उदाहरण कोल्हापुरात पाहायला मिळतंय. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये (Kolhapur Agricultural Produce Market Committee) प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा शनिवारी दाखल झाला. कोल्हापूरकरांनी या हापूस आंब्यासाठी लावलेली बोली ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला तब्बल 51 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (dhananjay mahadik) यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सौद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरात सध्या या हापूस आंब्याचीच चर्चा सुरुय.
देवगड तालुक्यातील कुंभारमठ इथले शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत तब्बल 51 हजार रुपयांना खरेदी केला. देवगड हापूसला आजपर्यंत मिळालेला हा सर्वाधिक दर मनाला जातोय. राज्यातील हापूल आंब्यासाठी यावर्षीचा हा सर्वाधिक दर असल्याचा दावा देखील करण्यात आलाय.
दरम्यान, पाच डझन आंब्याला 51 हजार रुपये इतका दर मिळल्याने एका डझनाचा दर हा 10 हजार 200 रुपये दरम्यान पोहचला आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची हा भाव परवडेल असे नाही. त्यामुळे सध्यातरी सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखता येणार नाही.
आंबा उत्पादकांना मोठा फटका
दरम्यान, यावर्षी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे आंब्याचा यंदाचा हंगाम हा 50 दिवसांचा मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 15 ते 20 फेब्रुवारीपासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होईल. हापूस मोहोराला चांगली सुरूवात झाली होती. मात्र अवकाळी पावसाचा तडका बसल्याने शेकडो हापूसच्या बागातील मोहोर नोव्हेंबरमध्ये गळून पडल्याने याचा मोठा फटका आंबा उत्पादकांना बसणार आहे.