लॉकडाऊन कालावधीत ५१ हजार वाहने जप्त

राज्यात ५१ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Updated: May 2, 2020, 03:27 PM IST
लॉकडाऊन कालावधीत ५१ हजार वाहने जप्त title=

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात देशासह राज्यातील कायदा व्यवस्था कठोर करण्यात आला आहे. २२ मार्च ते १ मे या कालावधीत राज्यात ५१ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर ८९ हजारहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या १२०० हून अधिक वाहनांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली.

राज्यात कलम १८८ चे उल्लंघन करणाऱ्या ८९ हजार ३८३ गुन्हे दाखल झाले असून १७,८१३व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी ३ कोटी १४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. 

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२४२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५१,०१३ वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत. 

लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यभरात १०० नंबर वर ८२,१२८ फोन आले आहेत. हातावर क्वारंटाईनचा शिक्का ६२८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

पोलिसांवर हल्ला 

लॉकडाऊन कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. अशा ६५७ आरोपींना अटक करण्यात आली असून १७१ प्रकार समोर आले आहेत.

सर्वाधिक रुग्ण 

राज्यात कोरोनाचे १ मे रोजी सर्वाधिक १००८ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ११ हजार ५०६ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाच्या २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यांची संख्या ४८५ वर पोहोचली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्यात चिंता आणखी वाढल्या आहेत. देशात आज पुन्हा २ आठवडे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे १७ मेपर्यत हा लॉकडाऊन राहणार आहे.