भयानक! आठ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली; दोन दिवसांनी तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला

सोमवारी रात्री बेपत्ता झाल्यानंतर मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला.

Updated: Nov 30, 2022, 06:58 PM IST
भयानक! आठ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली; दोन दिवसांनी तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडाऱ्यात( Bhandara) एक खळबळजनक घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या आठ वर्षाच्या मुलीचा डायरेक्ट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीसोबत नेमक काय घडल? तिची हत्या तर करण्यात आली नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. साकोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे.

मृत मुलगी ही साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त पापडा येथे राहणारी आहे. ती इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकत होती. सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास घराबाहेरील परिसरात खेळण्यासाठी गेली होती. मात्र, ती घरी आलीच नाही. कुंटुंबियांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. 

मात्र, रात्री उशिरापर्यंत ही मुलगी घरी न परत न आल्याने तिच्या कुटुंबियांनी थेट पोलिस ठाणे गाठले. या घटनेची माहिती साकोली पोलीस विभागाला देण्यात आली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी रात्री सुमारे 10.30 वाजता आपल्या ताफ्यासह पापडा गाव गाठले.

शोधमोहिमेसाठी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. मंगळवारी दिवसभर शोध घेऊनही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज बुधवारी सकाळी गावापासून जवळच असलेल्या तणसाच्या ढिगाऱ्यात जळालेल्या अवस्थेत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या झाल्याचा सशंय व्यक्त केला जात आहे.