Crime : डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime :  नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड. पोलिसांच्या छापांमध्ये 45 लाखांचा तब्बल 650 किलो गांजा जप्त.

Updated: Apr 1, 2023, 07:01 PM IST
Crime : डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती;  45 लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार :  नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलिसांनी एक धक्कादायक कारवाई केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी टाकलेल्या छापांमध्ये 45 लाखांचा तब्बल 650 किलो ओल्या गांज्याची झाड जप्त करण्यात आली आहेत. 

धडगाव तालुक्यातील निगडीचा कुंद्यापाडा शिवारात गांजाच्या शेतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका व्यक्तीने आंब्याच्या वनराई जवळ गांजाची बेकायदेशीर लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी येथे धाड टाकली. 

पोलिसांची धाड पडल्यानंतर संबंधित आरोपी तिथून पळ काढत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी शेताची पाहणी केली असता हिरवट रंगाची 648 किलो वजनाचे एकूण 479 गांजाची झाडे आढळून आली. आरोपी रूपजा सिंगा पाडवी यांच्यावर कारवाई केली असून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळ्यात गांजाची शेती नष्ट

धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी तालुक्यातील उमर्दा गावातील गांजाची शेती नष्ट केली आहे. पोलिसांनी या कारवाईत सव्वातीन लाख रुपये किमतीच्या गांजाची झाडं जप्त केली आहेत. या कारवाईत संबाऱ्या पावरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कापूस, ज्वारी , मक्याची पिकांत गांजाची शेती मधोमध करण्यात येत होती. 

ज्वारीच्या शेतात गांजाची शेती

सोलापुरात चक्क ज्वारीच्या शेतात गांजाची शेती करण्यात आली. बार्शी तालुक्यातील मुंगशीतील लिंबराज घोडके यांच्या शेतावर पोलिसांनी धाड टाकली. तिथून साडे 5 किलो गांजा आणि गांजाची शंभर झाडे पोलिसांनी जप्त केली. त्याची अंदाजे किंमत 60 हजार रुपये आहे. 

ऊसाच्या शेतात गांजाची लागवड

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी इथे अवैध गांजा शेतीवर छापा टाकून 67 लाख पन्नास हजार किमतीचा एक टन 350 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. उमदी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलीय. महेश पट्टणशेट्टी आणि श्रीशैल पट्टणशेट्टी यांनी आपल्या दीड एकर ऊसाच्या शेतामध्ये गांजाची ही लागवड केली होती.  माहिती मिळताच उमदी पोलिसांतील उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी छापा टाकण्यात आला. सात ते आठ फूट उंच गांजाची झाडे इथे आढळली. आरोपी महेश पट्टणशेट्टी आणि श्रीशैल पट्टणशेट्टी हे दोघे फरार झालेत.