राज्यातील सर्वात मोठी विहीर; तब्बल 2 कोटी खर्चून बांधली, पाहा तिचा भव्य नजराणा

 Farmer built Well in Beed : तुम्ही विहीर पाहिली असेल. पण तब्बल एका एकरात पसरलेली विहीर कधी पाहिलीय का? चला आज आम्ही या विहिरीबद्दल सांगत आहोत.  

Updated: Feb 12, 2022, 08:21 AM IST
राज्यातील सर्वात मोठी विहीर; तब्बल 2 कोटी खर्चून बांधली, पाहा तिचा भव्य नजराणा title=

विष्णु बुरगे / बीड : Farmer built Well in Beed : तुम्ही विहीर पाहिली असेल. पण तब्बल एका एकरात पसरलेली विहीर कधी पाहिलीय का? चला आज आम्ही या विहिरीबद्दल सांगत आहोत. बीडच्या शेतकऱ्यानं बांधलेली ही महाकाय विहीर. (A gigantic well one acre in Beed; Farmers built it at a cost of Rs 2 crore)

कुणाचं नशीब कधी फळफळेल, सांगता येत नाही. बीडच्या मारोती बजगुडे या शेतकऱ्याचे नशीब असंच फळफळले आणि त्यानं चक्क आपल्या एक एकर शेतात महाकाय विहीर बांधली. बीडच्या दुष्काळी भागातली ही विहीर. पण यंदा चांगला पाऊस झाला आणि ही विहीर तुडुंब भरली. आता एवढी मोठी विहीर बांधण्याचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...? सांगूया.

औरंगाबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचं काम बीडमध्ये सुरू झालं. गेवराई तालुक्यातल्या पाडळसिंगी गावातले मारुती बाजगुडे यांची एक एकर जमीन रोड बनवणाऱ्या IRB कंपनीनं गौण खनिज खोदकामासाठी घेतली. इथला मुरूम आणि खडक रस्त्याच्या कामात वापरण्यात आला. त्यापोटी बाजगुडेंना लाखो रुपयांचा मोबदलाही मिळाला.

रस्त्याचं काम झाल्यानंतर बाजगुडेंच्या शेतात मोठी खदान तयार झाली. बाजगुडे यांनी शक्कल लढवली. त्यांनी या खदानीला सगळ्या बाजूंनी कठडा बांधून घेतला. तब्बल दोन कोटी रुपये खर्चून तयारी झाली 202 फूट रूंद आणि 41 फूट खोल विहीर. त्यात कधी नव्हे तो यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडला. आणि ही एक एकरातली विहीर पाण्यानं तुडुंब भरली.

मारूती बाजगुडे यांच्याकडं बारा एकर जमीन आहे. कोरडवाहू शेती करणारे बाजगुडे आता पाणी आल्यानं बागायतदार शेतकरी झालेत. सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी परिस्थिती असते.  सरकारी कामासाठी संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला अनेकांना वर्षानुवर्षे मिळत नाही. पण मारूतीरावांची बातच न्यारी. त्यांनी मोबदला तर पदरात पाडून घेतलाच. शिवाय मोकळ्या खदानीचं रुपांतर महाकाय विहिरीत केलं. वेल डन, मारुतीराव.