Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire :  बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.

Updated: Apr 4, 2023, 05:59 PM IST
Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले  title=

सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक :  शिवशाही बसचा टायर फुटून बस पेटली आहे (Shivshahi Bus Fire). नाशिकमध्ये (Nashik) ही घटना घडली आहे. त्वरीत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. बस मधील बिघाडाबाबत ड्रायव्हरच्या आधीच लक्षात आले होते. यामुळे त्याने घेतलेल्या एका   निर्णयामुळे प्रवासी बचावले आहेत. एसटी महामंडळाच्या बसेसना वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे.   

नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानक परिसरात शिवशाही बसला आग लागली. टायर फुटल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  नाशिक माजीवाडा बोरिवली (बस क्रमांक - एमएच 06 बी डब्ल्यू 11 87) या बसला आग लागली. अचानक आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बस चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले

ही बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.

बस स्थानकात येताच बसच्या टायरचा स्फोट झाला. यामुळे बसला आग लागली. बस चलाकाने वेळीच धोका लक्षात घेत प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे कर्मचारी, एक बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

नादुरुस्त बसेसमुळे एसटी ड्रायव्हर चिंतेत

एसटी महामंडळाच्या हजारो बसेस बिघडलेल्या आहेत. बस बंद पडल्यास तात्पुरती दुरुस्ती करुन बसेस पुन्हा चालवल्या जातात. यामुळे बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. बस चालकांना ड्रायव्हिंग करताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. या  नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.