Ajit Pawar Birthday : गुलाबी जॅकेट, गुलाबी बॅनर, गुलाबी स्टेज आणि आता गुलाबी रिक्षा... अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जणू गुलाबी कातच टाकलीय. हा गुलाबी सिलसिला सुरु झाला तो बारामतीच्या सभेपासून.. तशी दादांनाही मुख्यमंत्रीपदाची गुलाबी स्वप्नं पडतच असतील. रंग माझा वेगळा म्हणत दादांनी सगळंच गुलाबी करुन टाकलंय. दादांच्या गुलाबी रंगाची चर्चा विरोधकांमध्येच नाही तर संपूर्ण राज्यात रंगलीय. आणि अजित पवारांच्या वाढदिवसादिवशीच त्यांच्या अर्धांगिणीने म्हणजे सुनेत्रा पवारांनी गुलाबी जॅकेटवर पांढरा गुलाब लावत दादांचं आयुष्य ख-या अर्थाने गुलाबी केल आहे.
आता अजित पवारांच्या बॅनरपासून ते जॅकेटपर्यंत सध्या एकच रंग दिसतोय तो म्हणजे गुलाबी.. आता अहिल्यानगरमध्ये एका महिलेनेच दादांना तुम्ही सतत गुलाबी जॅकेट का घालता? असा प्रश्न विचारला..
राजकारणातला हा गुलाबी रंग तसा नवा नाही. केसीआर यांच्या बीआरएसने महाराष्ट्रातही गुलाबी रंगाचं वादळ आणलं होतं. परंतु ते अचानक लुप्त झालं. आता तोच रंग दादांनी उचललाय. राष्ट्रवादीचं काम करणाऱ्या एजन्सीनं हा रंग सुचवल्याचं बोललं जातंय. मात्र दादांची ही ‘गुलाबी’ चाल विरोधी पक्षातल्या नेत्यांसह सर्वपक्षीयांना भुरळ घालून गेलीय.
हिंदी चित्रपटावरती गुलाबी रंगावर गाणे आहेत त्यामुळे माणसात बदल होतो. त्यांना सर्वच गुलाबी आवडायला लागलं. त्यांनी शंभर जॅकेट शिवले असतील त्यामुळे दररोज गुलाबी जॅकेटच त्यांच्याकडे असते. माणसांनी असे प्रयोग करायला हवे कारण माणसं अडचणीत किती बदलतात हे त्यातून दिसत असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
गुलाबी रंगावरुन दादांना डिवचण्याची संधी विरोधकांनीही सोडलेली नाही.कुठलाही रंग वापरू दे लोकसभेमध्ये त्यांची लाल झाली आहे. त्यामुळे त्यांनी लाल रंग वापरलेला बरा. कुठलाही वापरा. काही फरक पडत नाही असा टोला विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
अजित पवारांनी ज्या अमोल कोल्हेंना कसा निवडून येतो ते बघतो असं चॅलेंज दिलं होतं. त्यांनीही गुलाबी रंगावरून दादांना चांगलाच रंग दाखवलाय. अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा, महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं... अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा तो काळा रंग दूर व्हावा असं अमोल कोल्हे म्हणाले.