अहमदनगर : महापालिका पोटनिवडणुकीतील वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील वसंत ठुबे यांचे कुटुंबीय अजूनही दहशत आणि दडपणाखाली वावरत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अजुनही तणावपूर्ण शांतता आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ६०० शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आमदारांच्या अटकेचं सत्र सुरुच राहण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीच्या आमदारांना पोलीस ताब्यात घेऊ शकतात, अशी स्थिती आहे. संग्राम जगतापांनंतर आता भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक करण्यात आलेय. दुसरीकडे आरोपींना फाशी देण्याची पीडित ठुबे कुटुंबीयांनी मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेत. आजही नगरमध्ये तणाव दिसून येत आहे. कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
या कुटुंबाचा आधार तुटला आहे आणि ते दुखी असून त्यांची लहान मुले आईचं सांत्वन करत आहेत. या पीडित कुटुंबाला न्याय हवा आहे . शिवसेनेनेन या कुटुंबाची जबाबदारी घ्यायचे ठरवलंय. हत्या झालेल्या वसंत ठुबे यांची पत्नी अनिता ठुबे यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी बातचीत केली असता , आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करुन एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केलीय. सातारात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरुन राज्य सरकारला जाब विचारलाय.
अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये झालेल्या हिंसाचारात हत्याकांडानंतर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोडप्रकरणी शिवाजी कर्डीले यांना अटक करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे.