ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की

रात्री बारापर्यंत मोठ्या आवाजात गाणी वाजवली जात होती, पोलिसांनी गाणी बंद करण्यास सांगितल्याने आला राग

Updated: May 7, 2022, 09:52 PM IST
ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला आमीर खानची धक्काबुक्की title=
संग्रहित फोटो

ठाणे : ध्वनिक्षेपक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर पोलीसांच्या वाहनाची काचही फोडण्यात आली. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरिनिवास भागात गुरुवारी रात्री उशीरापर्यंत ध्वनीक्षेपक सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ध्वनिक्षेपक बंद करण्यास सांगितलं त्यावेळी तिथे असलेल्या आमीर शाहीद खान (३३) नावाच्या मुलाने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. 

सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत. असं असताना हरिनिवास चौक इथं गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक सुरू असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. 
मिळालेल्या माहितीच्या आधारे नौपाडा पोलीस घटनास्थळी गेले. पोलीस पोहचले त्याठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरु होता आणि मोठ्या आवाजात गाणी सुरू होती. पोलिस घटना स्थळी पोहोचताच आवाज बंद करण्यात आला. पोलीस कार्यक्रमाच्या आयोजकांची चौकशी करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी अमीर खान नावाचा तरुण आला आणि त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. 

इतकंच नाही तर आरडा-ओरडा करत त्याने पुन्हा गाणी सुरु लावण्यास सांगितलं. पोलीस त्याला समजावत असताना, तो पोलीस वाहनाच्या छतावर चढला आणि त्याने वाहनाची काच देखील फोडली. पोलिसांनी त्याला गाडीवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला त्या वेळी त्याने पोलिसांना धक्कबुकी करण्यास सुरुवात केली.
 
या घटनेनंतर पोलिसांनी आमीरला ताब्यात घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात आणलं. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.