'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: फेसबुक लाईव्हवर मुलाखत सुरु असतानाच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 9, 2024, 12:43 PM IST
'तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला...'; पत्नीचा धक्कादायक खुलासा title=
पोलीस चौकशीमध्ये केला खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासामध्ये नवीन माहिती समोर येत असतानाच मॉरिसच्या पत्नीने खळबळजनक दावा केला आहे.

मोठा पोलीस बंदोबस्त

दहिसरमध्ये घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गुरुवारी रात्रीच मॉरिसच्या ऑफिसमध्ये दाखल झाले. हे ऑफिस सील करण्यात आलं असून घोसाळकर आणि मॉरिसची लोकप्रियता पाहता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांनी वेगवेगळ्या तुकड्या करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला. दरम्यान पोलिसांच्या एका टीमनं मॉरिसच्या पत्नीची चौकशी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालेल्या मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे.

मॉरिसच्या पत्नीनं काय सांगितलं?

पोलिसांनी मॉरिसच्या पत्नीचा जबाब नोंदवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जबाबामध्ये मॉरिशच्या पत्नीने पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉरिशच्या मनात घोसाळकर यांच्याविरुद्ध तीव्र संताप होता, अशी माहिती मॉरिशच्या पत्नीने दिली आहे. "अशा परिस्थितीमध्ये जवळपास साडेचार महिने मॉरिस हा बलात्काराच्या गुन्ह्यात तुरुंगात राहून आला होता. जामीनावर तुरुंगातून सुटून घरी आल्यानंतर मॉरिस सारखा, 'मी अभिषेक घोसाळकरला सोडणार नाही. मारून टाकणार!' असं बोलायचा," अशी माहितीही मॉरिसच्या पत्नीने दिल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच मॉरिस आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

नक्की वाचा >> मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, 'आता 5 वाजता...'

मॉरिसच्या निकटवर्तीयाला अटक

मयत आरोपी मॉरिसचा स्वीय सहाय्यक मेहुल पारीखला रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्यावेळी मेहुल पारीख घटनास्थळी उपस्थित होता. फेसबुक लाईव्ह सुरु असताना कॅमेराच्या मागे मागे मेहुलचं उपस्थित होता. मेहुल हा मॉरिसच्या अगदी जवळचा साथीदार असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे या हत्येचा कट रचण्यात त्याचीही काही भूमिका होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.

नक्की वाचा >> तो फोन कॉल, ऑफिसमधले लाईट्स गेले अन्..; Eyewitness ने सांगितला घोसाळकरांवरील गोळीबाराचा थरार

ते पिस्तुल कोणाचं?

मॉरिसने घोसाळकरांवर ज्या पिस्तुलमधून गोळीबार केला ते त्याच्या मालकीचं नव्हतं. मॉरिसला पोलिसांनी शस्त्र परवानाचा दिलेला नव्हता अशी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मॉरिसचा बॉडीगार्ड शर्मा यांच्या नावाने परवाना जारी केलेलं पिस्तुल मॉरिसने वापरल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी शर्माला अटक केली आहे.