धुळे : लाचखोर अधिकाऱ्यांची चौकशी करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यालाच लाच घेतल्याप्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातले शाखा अभियंता विनोद वाघ यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली.
मंत्रालयातले सहाय्यक सचिव आणि प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी प्रभाकर पवार यांचा साथीदार प्रशांत गवळी, याला 25 हजारांची लाच घेताना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. त्यानंतर प्रभाकर पवारलाही अटक केली गेली.
नाशिक परिक्षेत्रातल्या महसूल, पोलीस, कृषी, पीडब्ल्यूडी विभाग यासह विविध शासकीय विभागांतल्या सुमारे दीडशे वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांची प्रभाकर पवार यांच्याकडे खाते निहाय चौकशी सुरु आहे. यात सुमारे 12 डीवायएसपींचाही समावेश आहे.
यामुळे प्रभाकर पवारांनी या आधी केलेल्या खातेनिहाय चौकशाही संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या कारवाईमुळे राज्य प्रशासनाच्या मुख्यालयातला मोठा मासा एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला आहे.