यवतमाळ : मोलमजुरी करणाऱ्या १५ जणी एकत्र येतात काय, आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवतात काय. यवतमाळच्या कोठा गावातील श्री संत मत्तु मालक महिला स्वयंसहायता समूहाने कुक्कुटपालन मदर युनिट उभारून महिला बचतगट हे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सिद्ध केलंय. पाहूया या महिलांची भरारी.
यवतमाळच्या कळंब तालुक्यातील कोठा गावात शेतकरी व शेतमजुरी करणाऱ्या १५ महिलांनी श्री संत मत्तु मालक महिला स्वयंसहायता समूह २०१२ साली स्थापन केला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत व पुणे येथील अफार्म संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने कुक्कुट पालन व्यवस्थापन प्रशिक्षण या महिलांनी घेतलं आणि करीता कोठा येथील सरस्वती ग्राम संघाच्या आर्थिक साहाय्याने कुक्कुटपालन मदर युनिट उभारले.
पक्षांची काळजी कशी घ्यावी, कोंबडीपालन लसीकरण, चोची कापणे, खाद्य, मदर युनिट मधील वातावरण, आणि संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी अशी सारी कामं महिला करतात. पक्षांचे खाद्य म्हणून तिथेच अझोलाचे टाके निर्माण करण्यात आले. सोबतच युनिटच्या जागेतच परसबाग लाऊन रसायनविरहित भाजीपाला उत्पादन घेतल्या जाते. याठिकाणी शाश्वत शेतीसाठी दशपर्णी, निंबोळी, लमीत अर्क देखील तयार करण्यात येते. सुरुवातीला तुटपुंज्या रोजगारावर मोलमजुरी करणाऱ्या महिलांनी बचत गट चळवळीतून एकत्र येत स्त्री शक्तीचं अनोखं दर्शन घडवलंय.