Rajan Salvi ACB Inquiry : ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी आज होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Rajan Salvi Inquiry ) त्यामुळे आज राजन साळवी हे अलिबाग एसीबी समोर हजर राहणार नाहीत.दरम्यान, पुढील महिन्यात 3 किंवा 4 एप्रिल रोजी हजर व्हावे लागणार आहे.
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी
राजन सावळी हे आज आपल्या कुटुंबासह अलिबाग एसीबी समोर हजर राहणार होते. त्यासाठी ते मुंबईतून रो-रो सेवेने अलिबागला दाखल होणार होते. मात्र, एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे साळवी कुटुंबीयांची चौकशी पुढे ढकलण्यात आली आहे. ही चौकशी आता तीन आणि चार एप्रिलला होणार आहे. त्यामुळे अलिबागच्या एसीबी कार्यालयातून राजन साळवी यांना आज येऊ नका म्हणून फोन गेला. राजन साळवीचे कुटुंबीय आज एसीबी चौकशीला सामोरे जाणार होते.
राजन साळवी यांच्या पत्नी, दोन मुलं आणि मोठा भावाला एसीबीने नोटीस पाठवली होती. राजन साळवी यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मागे देखील एसीबीने आता चौकशीचा ससेमीरा लावला आहे. राजन साळवी यांची पत्नी अनुजा, भाऊ दीपक आणि दोन मुले एसीबी कार्यालयात जाणार होते. त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. तशी एसीबीकडून नोटीस पाठविण्यात आली होती.
दरम्यान कितीही चौकशी झाली तरी उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नसल्याची प्रतिक्रिया राजन साळवी यांनी पुन्हा एकदा दिली आहे. आपल्याला जाणूनबुजून त्रास देण्यात येत आहे. माझ्यावर दबाव आणला जात आहे. मी ऐकत नाही, हे समजताच आता माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्यात येत आहे. मात्र, काहीही झाले तरी आपण उद्धव यांच्यासोबतच राहणार आहोत, कितीही चौकशी करा, असे आव्हान त्यांनी विरोधकांना दिले आहे.