Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला मार

Bacchu Kadu Accident News : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bacchu Kadu) यांचा मोठा अपघात झाला आहे. (Bacchu Kadu Accident) रस्ता क्रॉस करतांना हा अपघात झाला आहे. 

Updated: Jan 11, 2023, 10:33 AM IST
Bacchu Kadu Accident : आमदार बच्चू कडू यांचा अपघात, डोक्याला मार title=

Bacchu Kadu Accident News : अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू ((Bacchu Kadu) यांचा मोठा अपघात झाला आहे. (Bacchu Kadu Accident) रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. बच्चू कडू यांना एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले असून त्यांना तात्काळ अमरावतीच्या (Amravati) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आज अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकावर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे.

याआधी तीन आमदारांच्या कारला अपघात

दरम्यान, मागील 20 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore), राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Shinde Group MLA Yogesh Kadam) यांच्या कारला अपघात झाला. (Car Accident) या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहे. त्याआधी 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे कार अपघातात निधन झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा अपघातांंची मालिका पाहता आमदारांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला 24 डिसेंबरला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार नदीत कोसळली. या अपघातात गोरे गंभीर जखमी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला परळीत अपघात झाला. कार्यक्रम आटोपून घरी जात असताना रात्री मुंडेंचा अपघात झाला. या अपघातात मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. धनंजय मुंडे यांना  एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणण्यात आले. ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अशी माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली. 

मुंबई - गोवा महामार्गावर दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या कारला अपघात झाला. डम्परने त्यांच्या कारला धडक दिली. यात कदम सुदैवानं बचावले आहेत. हा घातपात असल्याचा आरोप योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी केला होता. या अपघात प्रकरणी डम्पर चालकाला पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीत ब्रेक निकामी झाल्याने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, अशी माहिती दिली.