Pandharpur News : पंढरपूरमध्ये (Pandharpur Accident) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन शाळकरी मुलींना जीव गमवावा लागला आहे. एकाच दिवशी पंढरपूर परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना पंढरपूर तालुक्यातील भोसे पाटी येथे देविदास जमदाडे यांची मुलगी अक्षरा हिचा अपघाती मृत्यू झाला. भोसे पाटी येथे वाहनाखाली आल्याने अक्षराचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत बार्डी गावाजवळ दहावीचा (SSC Exam) मराठीचा पेपर देऊन भावा सोबत दुचाकीवर घरी जाणाऱ्या राधा नवनाथ आवटे हिचा झाडाची फांदी अंगावर पडून जागीच मृत्यू झाला.
नेमकं काय झालं?
भोसे येथील यशवंत विद्यालयात सातवीत शिकणारी अक्षरा जमदाडे गुरुवारी शाळा सुटल्यानंतर घरी परतत होती. त्यावेळी 11 वाजण्याच्या सुमारास भोसे पाटी येथून अक्षरा घरी जाण्यासाठी पीकअपमध्ये बसली होती. मात्र पीकअपचा दरवाजा उघडल्याने अक्षरा खाली पडली आणि बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दुसऱ्या घटनेचा दहावीचा पेपर देऊन परतणाऱ्या राधा आवटे या विद्यार्थिनीला जीव गमवावा लागला आहे. राधा गुरुवारी दहावीचा मराठीचा पेपर देऊन भावासोबत बाईकवरुन ढेकळेवाडी येथे नातेवाईकांकडे जात होती. त्यावेळी बार्डी रोडवरील एमएसईबी कार्यालयाच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या पेटलेल्या झाडाची फांदी राधाच्या अंगावर पडली. यामध्ये राधाच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर तिला करकंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
नाशिकचे दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
दुसरीकडे नाशिकमध्येही गुरुवारी दुचाकीला झालेल्या अपघातात दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. परीक्षेला जाण्यापूर्वीच मृत्यूने विद्यार्थ्यांना गाठलं. शुभम रामनाथ बरकले आणि दर्शन शांताराम आरोटे अशी दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील शुभम आणि दर्शन दोघेही दहावीची परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरुन निघाले होते. सिन्नर- घोटी महामार्गावरील आगासखिंड शिवाराजवळ त्यांची दुचाकी टँकरवर आदळली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.