नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

 ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल 

Updated: Apr 22, 2021, 09:06 AM IST
नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक : नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयात (Zakir Husain Hospital) दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) आक्रमक पाऊले उचलली आहेत. ऑक्सिजन गळतीप्रकरणी (Oxigen Leakage) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी याप्रकरणाचा तपास करणार आहेत. ही घटना घडल्यानंतर ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ गायब होते. पुण्यातील टाय निप्पॉन सो कंपनीला काम देण्यात आले होते.  काम दिल्याप्रकरणी नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रडारवर आले आहेत. 

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती (Oxygen Leakage) होऊन झालेल्या दुर्घटनेत 22 रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे. ही  घटना अत्यंत दुर्देवी आणि मनाला वेदना देणारी आहे. या घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. (Nashik Oxygen Leakage: High Level Committee chaired by Divisional Commissioner Radhakrishna Game)

नाशिक  महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळतीच्या ठिकाणी भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंणगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, वैद्यकिय अधिकारी डॉ.आवेश पलोड आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेचा तपास आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी सात जणांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली आहे. या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश असून सदर समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार असल्याचे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

घटनेच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे घटनेची सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्यात येईल.तसेच दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी दिली. तसेच या घटनेची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये यासाठी या समिती मार्फत एसओपी तयार करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

नाशिक  महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेची पाहणी करुन माहिती घेतली असता तांत्रिक दोषांमुळे ही घटना घडली आहे. सिलिंडर टँकमधून लिक्विड ऑस्किजनची गळती होऊ लागल्याने ही घटना घडली आहे. या गळतीमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालून शर्थीचे प्रयत्न केले आहे. पंरतु या दरम्यान रुग्णांना ऑक्सिजन पुरेसा पुरवठा होऊ न शकल्यामुळे यामध्ये 22 रुग्णांचा मृत्य झाला आहे.