VIDEO : 'अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवू'

शिरुरमध्ये राजकारण तापलं, कोल्हेंविरोधात प्रचंड असंतोष

Updated: Mar 16, 2019, 01:44 PM IST
VIDEO : 'अमोल कोल्हेंना त्यांची जागा दाखवू' title=

शिरुर : loksabha election 2019 शिरूर येथून अभिनय क्षेत्रातून राजकारणाकरडे वळलेल्या अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळाली आहे. असं असलं तरीही, त्यांच्याविरोधात शिरूर मतदारसंघात कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना अमोल कोल्हे यांची उमेदवारी रूचलेली नाही. विलास लांडे समर्थकांनी तर, अमोल कोल्हे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. एकिकडे पक्ष अडचणीत असतानाही ज्यांनी निष्ठा कायम राखत पक्षाला साथ दिली त्या विलास लांडे यांना दूर ठेवल्याचा राग कार्यकर्ते जागोजागी फलक झळकावून व्यक्त करत आहेत. 

राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरच काट मारण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली आहे.  अमोल कोल्हेंना त्यांची योग्य जागा दाखवणार असा इशारा देतानाच थेट अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या दुखावलेल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे एकंदरच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच कोल्हेंना मतदार आणि पक्षातीलच कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेससाठी अमोल कोल्हे हे आयात उमेदवार असल्याचीच भावना सध्या तग धरत आहे. शिवसेनेतून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे परिस्थिती पाहता पक्षातील मुळच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. लोकसभेसाठी उत्सुक असताना एकिकडे पक्षाकडून आपल्याला निवडणुकांच्या तयारीला लागा, असं सांगण्यात आलं. ज्या आदेशांनंतर पक्ष कार्यकर्त्यांनी तयारी सुरूही केली. पण, एकाएकी कोल्हेंना तिकीट देण्यात आलं त्यामुळे लांडे समर्थकांमध्ये कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मतदान प्रक्रियेदरम्यान आता मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.