आतिश भोईर, डोंबिवली : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना टाकलेली गुगली सध्या डोंबिवलीत चर्चेचा विषय बनली आहे. क्रिकेट सराव खेळपट्टीच्या उद्घाटनाप्रसंगी ठाकरे आणि शिंदे यांच्यात कशी राजकीय फटकेबाजी रंगली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे क्रीडाप्रेमी आहेत. त्यातही क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ. त्यामुळं डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात क्रिकेट सराव खेळपट्टीचं उद्घाटन करताना अर्थातच क्रिकेटचा डाव रंगला. बॅटिंगचा पहिला मान मिळाला तो आदित्य ठाकरेंना. ते जोशात फटकेबाजी करतील अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती. पण कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांनी वाईड बॉल टाकल्यानं युवा सेनाप्रमुखांची घोर निराशा झाली. कदाचित आपल्या चेंडूवर युवा सेनाप्रमुखांची दांडी गुल होऊ नये म्हणून नगरसेवकांनी ही खबरदारी घेतली असावी, अशीही चर्चा इथं रंगली आहे.
त्यानंतर बॅटिंगला आलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी चांगलीच फटकेबाजी केली. चेंडू टोलवता टोलवता त्यांना आठवण आली ती वडिलांची. म्हणजे पालकमंत्री एकनाथ शिंदेंची. त्यामुळं 'शिंदेसाहेबांना विचारा खेळणार का?' असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असलेल्या आदित्य ठाकरेंनी 'तिकीट कापलं जाईल तुझं', अशी गुगली टाकली. या वाक्यावर खासदार श्रीकांत शिंदे 'क्लीन बोल्ड' झाले. आणि उपस्थित शिवसैनिकांमध्ये एकच हंशा उसळला.