पुणे : राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. एकीकडे पुण्यात बीडीपीमध्ये शिवसृष्टीला परवानगी द्यायची आणि दुसरीकडे खासगी ट्रस्टच्या आंबेगाव इथल्या शिवसृष्टीला तीनशे कोटी रुपये दयायचे. राज्य सरकारकडून ही पुणेकरांची फसवणूक होत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बहुजन अस्मिता मोर्चानंतर लाल महालात आयोजित बहुजन अस्मिता परिषदेत अजित पवार बोलत होते. पुणेकरांना मेट्रोची गरज आहे. मेट्रो आणि शिवसृष्टी एकाच ठिकाणी झाली असती. पण खासगी ट्रस्टच्या शिवसृष्टीला प्रोत्साहन देऊन हे सरकार दुट्टपी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, सिंहगड रोडवरील अडीच एकर जागा मुळ मालकांना परत देण्याचा ठराव झाला आहे. त्याला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचं अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नेते तोंडघशी पडले आहेत.