Ajit Pawar On Mumbai Goa Highway: राज्य सरकारने अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पडला. मात्र आज अर्थमंत्री अजित पवार हे आज पुन्हा अर्थसंकल्प मांडणार आहे. अर्थसंकल्पावर विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अजित पवार यांनी आज उत्तर दिलं. मी अर्थमंत्री म्हणून स्पष्टपणे सांगू शकतो की अर्थसंकल्प फुटला नाहीये अर्थसंकल्पाची गोपनियता राखण्यात आली आहे, असं अजितदादा पवारांनी म्हटलं आहे. तसंच, यावेळी अजितदादांनी पायाभूत सुविधांबाबत बोलताना मुंबई-गोवा महामार्गाबाबतही वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहातही एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले की,नितीन गडकरींकडे तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्र्यांची जबाबदारी मिळाली आहे. त्याचाही आपल्याला किती तरी फायदा होता, अशी माहिती अजित पवार सभागृहात देत असतानाच विरोधकांकडून मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख करण्यात आला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाबाबत काही अडचणी वन विभागाच्या आल्या आहेत. काही लोकांचा विरोध. ही खंत प्रत्येकालाच आहे. मनमोहन सिंगांचं सरकार असल्यापासून ते आता ही दहा वर्षे गेली. परंतु काय झालं हे तपासलंच पाहिजे.
'जसा 'बॉम्बे टु गोवा' चित्रपट निघाला होता अमिताभ बच्चनचा तशा पद्धतीने मुंबई टु गोवा महामार्गाचे काम असा चित्रपट काढायला पाहिजे किंवा पुस्तकपण लिहायला पाहिजे. त्याला सगळेच जबाबदार आहे. काहींनी तिथे खड्डे बघितले, फोटो काढले, पाहणी केली. पण काही नाही. सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला. कितीतरी आमदार झाले किंवा खासदार पण रस्ता काही पूरा होऊना. पण गडकरी म्हणाले आहेत या टर्ममध्ये रस्ता पूर्णच करुन दाखवतो,' असं अजित पवार म्हणाले आहेत.
'शासनाने पायाभूत विकासांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग, पुणे रिंग रोड, जालना-नांदेड महामार्ग, नागपूर-गोंदिया नागपूर-चंद्रपूर महामार्ग अशा पद्धतीने पायाभूत सुविधा मजबूत होण्याच्या दृष्टीने राज्य सरकार त्याकडे लक्ष देतंय. शिवडी न्हावा शेवा प्रकल्प पूर्ण झाला. शिवडी फ्लायओव्हरचे कामही गतीने सुरू आहे. कोस्टल रोडचे कामही अंतिम स्तरावर आहे,' अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
'विरोधकांनी केलेल्या सूचनाची दखल अर्थविभागाने घेतली आहे. केंद्राने आपला अर्थसंकल्प मांडला की राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येतो, अशी परंपरा आहे. हा अर्थसंकल्प मांडताना राज्याने सर्वांगीण विकास व्हावा, महिला, शेतकरी सर्वांच्या अडचणी दूर व्हावा, याचा प्रयत्न या अर्थंसंकल्पातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वारकरी, महिला, शेतकरी या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
'जयंत पाटील यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड केला आहे, जयंत पाटील तुमचं त्यासाठी अभिनंदन. कुणाच्या हाताखाली काम करत असताना सर्व ढकलावे लागतं. मोठी जबाबदारी आली की मूड बदलावा लागतो, असा टोला अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला. मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली आहे. मला थोडाफार अनुभव आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी दिली. शेतकऱ्यांना एसडीआरएफच्या मदतीने योजना केली आहे. वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या आहे. शासनाने पायाभूत विकासांच्या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे.