Ajit Pawar Will Replace Eknath Shinde As CM: महाराष्ट्रामध्ये रविवारी म्हणजेच 2 जुलै 2023 रोजी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीच्या अन्य 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या राजकीय घडामोडीनंतर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया समोर येत असतानाच उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांसंदर्भात एक मोठा दावा केला आहे. अजित पवार यांनी यंदा भाजपाबरोबर केलेलं डील हे मुख्यमंत्रीपदासाठी असून विद्यमान मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 'घरी जाणार' असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंऐवजी लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकित केलं आहे.
संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गच्छंती होणार असा दावा केला. त्यानंतर पुन्हा पत्रकारांशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत यांना मुख्यमंत्री बदलणार हे कशाच्या आधारावर सांगताय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, "मी आधार सांगत नाही. मी सत्य सांगतोय. अजित पवार यांचं जे नियोजन, प्रयोजन आणि आयोजन आहे ते केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी नाही. अजित पवारांचा निर्णय हा त्यांचा स्वत:चा आहे. त्यांच्या पक्षांतर्गत निर्णयावर भाष्य मी करणार नाही. या निर्णयाचे दुरोगमी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होतील. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. पण यावेळी जी डील झाली आहे ती मुख्यमंत्रीपदासाठी आहे," असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांच्या या विधानावर, सध्याच्या मुख्यमंत्र्यांचं काय? असा प्रश्न एका पत्रकाराने संजय राऊत यांना विचारला. त्यावर राऊत यांनी, "सध्याचे मुख्यमंत्री घरी जातील. त्यांच्यासहीत 16 आमदार घरी जातील. एकनाथ शिंदेंसहीत 16 आमदार अपात्र 100 टक्के ठरतात. दिल्लीतील त्यांच्या महाशक्तीला हे कळून चुकलं आहे की आपण त्यांना वाचवू शकत नाही. न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावीच लागेल. ऑगस्ट 10 पर्यंत त्यांना हा निर्णय घ्यावा लागेल. म्हणून भाजपाने ही पुढली व्यवस्था त्यांनी केली. म्हणून अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देऊन ती जागा भरुन काढण्याचं काम झालेलं आहे," असं उत्तर दिलं.
मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या विस्तारामध्ये शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपदं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्याऐवजी धक्कातंत्राचा वापर करत भाजपाने थेट अजित पवार यांनाच सत्तेत सामील करुन घेतलं. भाजपाच्या या राजकीय खेळीमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा दबक्या आवाजात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.