Yuzvendra Chahal Instagram Story Divorce With Dhanashree: भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा या दोघांचा घटस्फोट होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यापूर्वीही मागील वर्षी दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा होती. त्यावेळी धनश्रीने तिच्या नावामधून 'चहल' हे अडनाव वगळलं होतं. आता तर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं असून एकमेकांसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवरुन हटवले आहेत. असं असतानाचा आता युजवेंद्रने ठेवलेल्या स्टोरीने एकच खळबळ उडाली आहे.
युजवेंद्र चहलने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सूचक विधान करणारी पोस्ट केली आहे. पत्नी धनश्री वर्माबरोबर युजवेंद्र घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर चहलने केलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या आई वडिलांचाही उल्लेख असल्याचं दिसत असल्याने दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसल्याची चर्चा अधिक जोर धरु लागली आहे. यापूर्वीच दोघांच्या एका निकटवर्तीयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दोघांमधील नातं संपुष्टात येणार हे निश्चित असून औपचारिक घोषणा शिल्लक असल्याचं विधान केल्याची बातमी समोर आलेली. त्यातच आता युजवेंद्र चहलची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.
"कष्ट केल्याने लोकांचं कॅरेक्टर कसं आहे यावर प्रकाश पडतो. तुम्हाला तुमचा प्रवास कसा आहे हे ठाऊक असतं. तुम्ही कोणती दु:ख सहन केली हे ठाऊक असतं. संपूर्ण जगाला माहिती आहे तुम्ही सध्या आहात तिथपर्यंत पोहचण्यासाठी काय काय केलं आहे. आपण आपल्या आई-वडिलांना अभिमान वाटावा म्हणून किती घाम गाळला आहे याची कल्पाना तुम्हालाच असते. एक चांगला मुलगा म्हणून कायम अभिमानाने मान उंचावून उभे राहा," असं चहलने या स्टोरीमध्ये म्हटलं होतं. त्याने काही वेळातच ही स्टोरी काढूनही टाकली.
युजवेंद्र चहल हा 34 वर्षांचा आहे. तर धनश्री ही 28 वर्षांची आहे. दोघांचा 2020 साली विवाह झाला असून लग्नापासूनच हे जोडपं कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. मध्यंतरी अनेकदा धनश्रीचं नाव सोशल मीडियावरुन भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरबरोबर जोडण्याचा खोडकरपणा नेटकऱ्यांनी अनेकदा केला. मात्र धनश्रीने अनेकदा आपण केवळ चांगले मित्र असल्याचं स्पष्ट केलं आहे. धनश्री ही युजवेंद्र चहलबरोबर लग्न केल्यानंतर अधिक चर्चेत आली. त्यापूर्वीही ती युट्यूबवर सक्रीय होती तरी ती प्रसिद्धीझोतात येण्यासाठी तिचं लग्न कारणीभूत ठरलं. मागील चार वर्षांमध्ये धनश्री अनेक अल्बममध्ये झळकली आहे. तिने अनेक अल्बममधील गाण्यांमध्ये आपलं नृत्य कौशल्य दाखवलं आहे. मध्यंतरी वर्ल्डकपमधून युजवेंद्र चहलला वगळल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवरुन पतीला पाठींबा दर्शवला होता.