Maharashtra Politics : एखाद्या वेबसिरीजला लाजवेल अशा राजकीय नाट्यानंतर बरोब्बर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. यानंतर आता या राजकीय नाट्याचा दुसरा भाग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे आता राष्ट्रवादी फुटली आहे. 40 आमदारांसह अजित पवार यांचा एक मोटा गट सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे.
शिंदेंसोबत सुरुवातीला 25 आमदार होते ती संख्या वाढत 35 आणि मग 50 पर्यंत जाऊन पोहचली. अनपेक्षितपणे शिंदे मुख्यमंत्री बनले आणि त्याचदरम्यान शिंदेंनी संख्याबळाच्या जोरावर शिवसेना पक्षावर दावा ठोकायला सुरुवात केली. शिवसेना पक्ष आणि चिन्ह हा वाद आधी सुप्रीम कोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निवडणूक आयोगाकडे गेला. 6 महिन्यांच्या कायदेशीर लढाईनंतर निवडणूक आयोगानं मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हं शिंदेंचंच असा निकाल दिला. आता हा सगळा घटनाक्रम आम्ही तुम्हाला सांगतोय कारण बरोब्बर वर्षभरानंतर हीच परिस्थिती राजकीय पटलावर पुन्हा निर्माण झालीय. अजित पवार राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेत भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झालेत.
ठाकरेंपेक्षा जास्त शिवसेना आमदार शिंदेंसोबत होते त्याचप्रमाणे अजित पवार गटाकडे शरद पवार गटापेक्षा अधिक आमदार आहेत. बंडानंतर शिंदेंनी आधी गुवाहाटी आणि मग मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं तर अजित पवारांनी बंडानंतर मुंबईत मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले. शिंदेंनी संख्याबळाच्या जोरावर पक्ष आणि चिन्हं आमचंच असा दावा केला, अजित पवारांनीही तोच कित्ता गिरवला. बंडांनंतर शिंदे गटानं राज्यभरात ठिकठिकाणी शिवसेना पक्षाच्या शाखांवर दावा ठोकायला सुरुवात केली तर बंडानंतर अजित पवार गटानंही राज्यातील कार्यालयं ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदेंना बंडानंतर मुख्यमंत्रीपद मिळालं तर अजित पवारांना बंडांनंतर उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे. वर्षभरानंतर राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं चित्र पाहायला मिळतंय. बदललेत ते फक्त पक्ष आणि चेहरे अर्थात या सा-या घडामोडींचा राज्याच्या विकासावर परिणाम झाला नाही म्हणजे मिळवलं.