Maharashtra Politics : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (chhatrapati sambhaji maharaj) धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते, असं विधान केल्याने राज्यातील वातावरण सध्या तापलं आहे. अजित पवार यांच्या या विधानावरुन भाजपकडून (BJP) टीका केली जात आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा देखील केला होता. छत्रपती संभाजी महाराजांबाबत सभागृहात केलेल्या विधानावर ठाम आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर दिलं आहे.
मी मांडलेली भूमिका चूकीची आहे हे ठरवणारं कोण?
"मी माझ्या कामाला आणि लोकांच्या प्रश्नाला महत्त्व देतो. आम्ही आधीपासूनत पुरोगामी विचार मानणारे आहोत. महापुरुषांच्या विचारांना धक्का न लावता पुढे जावं असा आमच्या सर्वांचा प्रयत्न असतो. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून केलेल्या घटना, नियमांचे सर्वांना पालन केले पाहिजे. पण त्यासोबत विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसेच मी जी भूमिका मांडली ती सगळ्यांनाच पटली पाहिजे असं काही नाही. पण मी मांडलेली भूमिका चूकीची आहे हे ठरवणारं कोण? मी असा काय गुन्हा केला आहे? जनतेला जी भूमिका पटेल त्याचे ते स्वागत करतील," असे अजित पवार म्हणाले.
छत्रपतींच्या विचारांसोबत आम्ही द्रोह करणार नाही - अजित पवार
यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाबाबत अजित पवार यांनी प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणावे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला जर हा द्रोह वाटतो तर गुन्हा दाखल करा. पण हा गुन्हा नियमांत बसतो का? छत्रपतींच्या विचारांसोबत आम्ही द्रोह करणार नाही," असेही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.