राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या शिर्डी येथील दोनदिवसीय मंथन शिबिराच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चाना उधाण आले आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनावेळीही अजित पवार यांनी असेच कार्यक्रमाचे व्यासपीठ सोडले होते. त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवार यांनी भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात होते. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झालीय. यानंतर आता पुण्यात (Pune) माध्यमांसोबत बोलताना अजित पवार यांनी स्वतः याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar talks about unhappy in the NCP)
"मी चार तारखेला बाहेरगावी गेलो होता. चार तारखेला रात्री उशीरा गेलो. 10 ला रात्री आलो. माहिती घ्यायची नाही आणि वेगवेगळ्या चॅनेलवर काहीही सुरु आहे. अजित पवार कुठे गेले हे कुणीतरी माझ्या ऑफिसला विचारायला हवं होतं. जो माणूस परदेशात जातो तो लगेचच याबाबत बोलू शकत नाही. मी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भाष्य करेन. कारण नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी कुठल्याही गोष्टीला सामोरा जाणार माणूस आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे," असे अजित पवार म्हणाले.
याआधीही अजित पवार यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांना नाराजीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांवर या नाराज असल्याच्या बातम्यांचे खापर फोडलं. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना "मध्यंतरी मला खोकल्याचा त्रास होता. नंतर काही दिवस मी दौऱ्यावर होतो. रात्री उशीरा आलो. इथं काहीही फालतू बातम्या देतात," असं म्हटले होते.