Akshay Shinde Encounter Post Mortem: बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा बायपासजवळ पोलिस वाहनातच झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. हा जाणिवपूर्वक केलेला एन्काऊंटर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. अक्षय शिंदेच्या मृत्यू संदर्भात वेगवेगळे तर्क लढवले जात होते. त्यामुळे सर्वांना पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय असेल? याची उत्सुकता लागली होती. अखेर 7 तासांनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय.
अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टम अहवालानुसार त्याचा मृत्य अती रक्तस्त्रावाने झाला आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे. मागच्या 7 तासांपासून शवविच्छेदन अहवाल तयार केला जात होता. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली होती. 5 डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केले आहे.
अक्षय शिंदे यांने पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणं आणि पोलिसांवर हल्ला या दोन मोठ्या कारणांमुळं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयने पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बदलापुरात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केलेल्या अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला.आणि आता याच एन्काऊंटरवरुन आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालीय. आरोपी अक्षय शिंदेला बदलापूरमध्ये न्यायचं असेल तर गाडी मुंब्राकडे का नेली?अक्षय शिंदेला पिस्तुलचे लॉक कसे काढता आले? दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांच्या कमरेला लागलेलं पिस्तूल कसं काढतो? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.