कैलास पुरी, झी 24 तास आळंदी : आळंदीत भाईगिरीचा मुळशी पॅटर्न पहायला मिळाला. जमीन खरेदी विक्री आणि त्याच्यावर आधारित निर्माण झालेले गुन्हेगारी विश्व यावर आधारित चित्रपट होता. आळंदीतल्या काही गुंडांनी टिकटॉकवर तलवारी, कोयते अशा धारधारी शस्त्रांचा वापर करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ त्यांनीच जाणीवपूर्वक व्हायरलही केला. मात्र आळंदी पोलिसांनी या गुंडांची थेट तुरुंगात रवानगी केली आहे.
हे भाई आळंदीच्या स्मशानभूमीत तिसरा व्हिडिओ बनवत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली. गणेश रंदवे, अक्षय हुंडारे, ओंकार पाटोळे, आकाश जाधव, काशिद अन्सारी आणि अर्जुन खिलारे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. मात्र, आरोपींना जामीन मिळाला आहे.
हा व्हिडिओ पाहिल्यावर व्हिडिओतील दृश्य एखाद्या चित्रपटातील आहेत की काय असंच वाटेल. पण हे व्हिडिओ आळंदीमधल्या उगवत्या भाईंनी बनवलेले आहेत. उगवत्या भाईंनी हे व्हिडिओ तयार केले खरे, पण त्यांची रवानगी थेट जेलमध्ये झाली.
टिक टॉक व्हिडिओची सध्या भलतीच चर्चा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक जण स्टार्स झालेत. पण याच माध्यमातून तुम्ही भाईगिरी करू पहात असाल तर तुमची रवानगी जेलमध्ये होईल यात शंका नाही.