केंद्रीय पथकाने ६ तासातच उरकला नुकसान पाहणी दौरा, शेतकरी नाराज

केवळ सहा तासांतच सहा तालुक्यातील शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी

Updated: Sep 22, 2020, 04:04 PM IST
केंद्रीय पथकाने ६ तासातच उरकला नुकसान पाहणी दौरा, शेतकरी नाराज  title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : खोड कीडीमुळे आणि इतर अनेक रोगामुळे राज्यातील लाखो हेक्टर वरील सोयाबीन खराब झाले आहे. याचा फटका अमरावती जिल्ह्यातील हजारो हेक्टर वरील सोयाबीन पीकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी खास दिल्लीवरून अमरावती जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाने केवळ सहा तासांतच सहा तालुक्यातील शेतात जाऊन नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून दौरा आटोपता घेतल्याने आता या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. 

सहा तासात सहा गावात केलेल्या नुकसान पाहणीतून काय साध्य होणार असा सवालही उपस्थित झाला आहे. केंद्रीय पथकाच्या या दौऱ्यावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ही आता टीका केली आहे.

या वर्षी बोगस बियाण्याने शेतकरी संकटात सापडले होते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले.;त्यात दुबार पेरणी करून शेतकऱ्यांनी कसे बसे सोयाबीन पीक उभे केले परंतू वातावरणातील बदला मूळे खोडकिडी च्या रोगाने आक्रमक केल्याने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने दोन अधिकाऱ्यांच एक केंद्रीय पथक तीन दिवसांपूर्वी अमरावती मध्ये येऊन गेलं आहे. या पथकाने जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ९ गावामध्ये जाउन गावानजीकच्या शेतात सोयाबीन नुकसानीची पाहणी केली. 

११ वाजता तिवसा तालुक्यात दाखल झालेल्या या पथकाने अवघ्या सहा तासांत पाहणी दौरा आटोपला या सहा तालुक्याचा जवळपास २०० पेक्षा जास्त किलोमीटर चा प्रवास या पथकाने केला त्यामुळे पाहणीला किती वेळ मिळाला असेल असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्रीय पथकाने केलेला अमरावती जिल्ह्यातील हा पहिला दौरा नसून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुद्धा केंद्रीय पथक हे नांदगाव तालुक्यात आले होते. परन्तु तेथील शेतकऱ्यांना देखील अद्यापही एक रुपयांची मदत मिळाली नाही. त्यामुळे केंद्रीय पथक फक्त पाहणी करायलाच येत का असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला आहे. 

सरकार नुकसान भरपाईच्या घोषणा करतात. नुकसान झाले की पंचनामा, सर्वेक्षण करण्याचे आदेश देतात. त्यात केंद्रीय पथकाच दौरा म्हटलं की शेतकऱ्यांच्या आशा आणखी पल्लवित होतात. पण मदत मात्र मिळत नाही ही वास्तवीकता आहे.