अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू झाले परंतु या ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्या परिस्थिती अभावी आई-वडिलांकडून विद्यार्थ्यांना मोबाईल मिळत नाही. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या. दरम्यान ऑनलाईन शिक्षणाला शेतकरी वडील मोबाईल घेऊन देऊ शकले नसल्याने अमरावतीच्या सावरखेड गावात १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अनिकेत नरेंद्र वानखडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मोर्शी तालुक्यातील निंभी येथे महाराष्ट्र विद्यालय इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होता. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावात राहणार्या अनिकेत वर्ग दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने जवळच असलेल्या निंबी येथील महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश केला.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहे. त्यामुळे शाळे द्वारे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारा महागडा हँडराइट मोबाईल घेऊन देण्याची परिस्थिती त्याच्या कुटुंबाची नाही.
त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यात अति पावसामुळे सोयाबीन कपाशी चे अतोनात नुकसान झाले घरी असलेला होता नव्हता पैसा पिकाला लागून गेला. त्यात उत्पन्न होईल ही आशा नाही. त्यात आधीच सोसायटीचे ६० हजारांचे कर्ज अशातच मुलाला मोबाईल घेऊन देता आला नाही.
दरम्यान ऑनलाइन शिक्षण सुरू झाले पण आपल्याला ते शिकता येत नाही याच विवंचनेतून अनिकेत ने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवून टाकली आहे.
शाळेचे अर्धे सत्र संपत आले असले तरी या शाळा केव्हा पासून सुरू होणार याचा ठोस निर्णय राज्य सरकारने घेतला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. मात्र परिस्थिती नसल्याने आई-वडील मुलांना मोबाईल घेऊन देऊ शकत नाही. त्यातूनच अलीकडच्या काही दिवसात विद्यार्थी नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या करीत असल्याचे समोर आलंय.