लस न घेता लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद, कोविड अ‍ॅपवर आलं सर्टिफिकेट

लस केंद्रावर लस घेण्यासाठी गेले देखील होते, मात्र 5 तास उभे राहून वाट पाहिल्यानंतर ही त्यांना लस काही मिळाली नाही.

Updated: Jul 14, 2021, 05:25 PM IST
लस न घेता लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद, कोविड अ‍ॅपवर आलं सर्टिफिकेट title=

मुंबई : कोविड लस न घेताच लसीकरण पूर्ण झाल्याची नोंद कोविड अ‍ॅपवर झाल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. अंबरनाथ शहरातील बारक पाडा भागात राहणाऱ्या अशोक जाधव यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी ऑनलाइन कोविड लसीकरणाची नोंदणी केली होती. त्यानुसार ते करवले गावातील लस केंद्रावर लस घेण्यासाठी गेले देखील होते, मात्र 5 तास उभं राहून वाट पाहिल्यानंतर ही त्यांना लस काही मिळाली नाही. त्यानंतर ते घरी परत आले. 

 त्यानंतर ते दुसऱ्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेले असता तिथे आपले लसीकरण आधीच झाले असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तसा मेसेज अशोक जाधव यांच्या मोबाईलवर आला होता. मात्र आपण लस न घेताच आपले लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आल्याने अशोक जाधव यांना धक्काच बसला. 

आता आपण दुसऱ्या लसीपासून देखील वंचित राहणार का? अशी भीती त्यांना वाटू लागली. त्यानंतर अशोक जाधव यांनी करवले गावातील लसीकरण केंद्रावर जाऊन  याबाबत तक्रार केली, मात्र तुम्ही 2 दिवसात परत या तुम्हाला लस दिली जाईल असे सांगण्यात आले. 

घडलेल्या प्रकाराबाबत लसीकरण केंद्र अधिकाऱ्यांना विचारणा केली असता काही सॉफ्टवेअरच्या अडचणींमुळे ही घटना घडली आहे, याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल असं प्रशासनातर्फे त्यांना सांगण्यात आलं. 

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या 2 ते 3 घटना या विभागात घडल्याचं ही समोर आलं आहे. जो नोंदणी करतो त्याच्या मोबाईलवर येणारा OTP क्रमांक हा दिल्याशिवाय लसीकरण होत नाही मात्र तो OTP क्रमांक न देताच अशाप्रकारे लसीकरण झाल्याची नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.