मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड

मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात दरवर्षी मार्च महिला लागला की या महिलांचा असाच जीवघेणा प्रवास सुरु होतो. 

Updated: May 22, 2024, 04:27 PM IST
मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात टॅंकर येताच उडते झुंबड title=

Amravati Melghat Water Problem : हिरव्यागार निसर्गाचा व मनाला भुरळ घालणारा अद्भूत नजरा म्हणजे मेळघाट. निसर्गाच्या सानिध्यात दडलेल्या या मेळघाटाची ओळख त्याच्या सौंदर्याने देशभरात आहे. परंतु या मेळघाटाच्या नशिबी आलेले बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, बेरोजगारी असे अनेक भोग मात्र स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सुटले नाही. अनेक सरकारे बदलली, पण मेळघाटाच्या कवेला घट्ट पकडून असलेला पाणी टंचाईचा भोग मात्र आजही कायम आहे. हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून एक किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या महिलांची व्यथा जाणून घेऊया. 

दुपारचे दोन वाजलेत, वरुन सूर्य जणू आग ओकतोय, अशा परिस्थितीत डोंगर दऱ्यातून वाट काढत पाण्यासाठी दगड गोट्यांना तुडवत दीड किलोमीटर चालत येणाऱ्या या महिला आहेत. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात दरवर्षी मार्च महिला लागला की या महिलांचा असाच जीवघेणा प्रवास सुरु होतो. गावाबाहेरील विहिरीत टँकरने पाणी आणून खाली केले तर या विहिरीतून पाणी भरायला मिळले. मात्र या विहिरीत टँकरने पाणी टाकले नाही तर हंडाभर पाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास आदिवासी महिलांना करावा लागतो.

गावातील पाण्याचे स्रोत आटले

खडीमल गावात पाणी टंचाईत देशपातळीवर चर्चेत आहे. मात्र या ठिकाणी घोटभर पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. या ठिकाणी गावात टँकर आला की भीषण अशी गर्दी पाणी भरण्यासाठी दिसून येत आहे. त्यामुळे या गावात पाणीबाणी निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यापासून या गावातील सर्वच पाण्याचे स्रोत आटले आहे. तर गावात पेयजल योजना नाही. हरघर नल ही योजना या गावात अद्यापही नाही. त्यामुळे घरोघरी नळ या योजनेचा दावा या गावात फेल झाला आहे. हे भयानक दृश्य एकट्या खडीमल गावचं नाही. मेळघाटातील अशा अनेक गावातील महिला पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून जीवघेणी कसरत करावी लागते. डोक्यावर दोन हंडे पाणी घेऊन अनेक महिला अनवाणी पायावरुन ऊन अन् खालून दगड तुडवत डोंगर माथ्यावर चढाई करताना दिसत आहे. यात अनेक वृद्ध महिला असल्याने अनेकजण पाय घसरुन खाली पडल्याच्या घटना घडली आहे. 

अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 10 पाणीटंचाईग्रस्त 65 गावांतील नागरिकांची तहान अधिग्रहित करण्यात आलेल्या 49 विहिरी आणि 29 बोअरवेलच्या पाण्यावर भागविली जात आहे. संबंधित गावातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत येत्या 30 जूनपर्यंत विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता सुनिल जाधव यांनी दिली.

मेळघाटात पाणी टंचाईसाठी करोडो रुपये खर्च

मेळघाटमधील युवक काँग्रेसचे पदाधिकारी राहुल येवले यांनी यावर प्रतिक्रिया देत खडीमल गावात अशुद्ध पाणी पुरवठा होतो. तर दिवसाला 15 टँकरने पाणी पुरवठा होतो, हा दावा खोटा असल्याचे त्यांनी सांगितले. तर शुद्ध पाणी पुरवठा गावात होत नाही, त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.

मेळघाटातील भीषण पाणीटंचाईचा फटका हा फक्त इथल्या माणसांनाच बसतो असे नाही, तर जनावरांना देखील पाणी पिण्यासाठी डोंगर दऱ्यातून न्यावे लागते. पाणी भरायला चिमुकल्या मुली सुद्धा जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विहिरीला फार पाणी नसल्याने आता गावात दर एक दिवसाआड पाण्याचा ट्रँकर येतो. त्यातही मुबलक पाणी नसल्याने महिलांची गर्दी होते. कुणाच्या भांड्यात पाणी पडतं, तर मग कुणाचा भांड रिकामी राहत. त्यानंतर मग पुन्हा सुरू होतो या महिलांचा डोंगर दऱ्यातून पाण्यासाठीचा प्रवास. दरवर्षी मेळघाटात पाणी टंचाई निवारणासाठी करोडो रुपये खर्च केले जातात. परंतु पाणी मात्र शासनाच्या कागदपत्रांवरूनच खळखळते. मेळघाटातील पाणीटंचाई जेवढी नैसर्गिक आहे. त्याच्यापेक्षाही ती प्रशासन निर्मित आहे. या जिल्ह्याचे नेतृत्व महिला लोकप्रतिनिधी करत असताना मात्र याच जिल्ह्यातील मेळघाट मधील महिलांना पाण्यासाठी होणाऱ्या वेदना कधी थांबवणार, असा प्रश्न उपस्थित होतो.

मेळघाटातील पाणी टंचाईचे काही महत्त्वाचे मुद्दे

  • पश्चिम विदर्भातील धरणात सध्या 32.40 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठ्यात घट
  • मागील वर्षी याच धरणात 36.19 टक्के इतका होता जलसाठा
  • पश्चिम विदर्भात 9 मोठे 27 छोटे मध्यम तर 245 लघु प्रकल्पांचा समावेश
  • वाढत्या तापमानामुळे जलसाठ्यात कमालीची घट
  • पश्चिम विदर्भातील धरणांना यंदाही दमदार पावसाळ्याची प्रतिक्षा