खासदार नवनीत राणा यांच्याकडून पुन्हा कोरोना नियमांना फाटा

corona crisis : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक काहीसा आटोक्यात आला तरी अद्याप कोरोनाचा धोका आहे. पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी कोरोना नियमांना फाटा दिला आहे.  

Updated: Oct 14, 2021, 01:05 PM IST
खासदार नवनीत राणा यांच्याकडून पुन्हा कोरोना नियमांना फाटा title=

अमरावती :  corona crisis : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक काहीसा आटोक्यात आला तरी अद्याप कोरोनाचा धोका आहे. पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी कोरोना नियमांना फाटा दिला आहे. दुर्गा मंडळाना भेटी देताना त्यांना ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. नवनीत यांनी ढोल वाजवताना अंदाज पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दीही केली होती. 

सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असतात. कधी पंतप्रधान मोदींचं कौतुक तर कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका तर कधी मेळघाटात आदिवासी बांधवांना सोबत केलेल आदिवासी नृत्य तर कधी गरब्यावर धरलेला ठेका अशा एक ना अनेक कारणांमुळे त्या सातत्याने चर्चेत आहेत. सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे पाहायला मिळतो आहे. 

मागील वर्षी कोरोनामुळे नवरात्रीच्या उत्सवावर सावट होते. परंतु यावर्षी कोरोनाची रुग्णसंख्या कमी असल्याने अनेक दुर्गा मंडळांनी नवरात्री उत्सव साजरा केला आहे. दोन दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील नवरात्री दुर्गा मंडळांना भेटी देऊन रास गरबा खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला होता. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा या काल अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात दुर्गा उत्सव मंडळांना भेटी आणि दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या.

या दरम्यान एका मंडळात ढोल-ताशे वादन सुरू होते. अशावेळी खासदार नवनीत राणा यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. लागलीच त्यांनी कमरेला ढोल बांधून ढोल वादन करत माँ दुर्गेचा जागर केला. त्यांच्या या कौशल्यपूर्ण ढोल वादनामुळे रास-गरबा प्रेमींचा उत्साह वाढला. मात्र, त्यांनी पुन्हा कोरोना नियमांना फाटा दिला.

दरम्यान, नवनीत राणा यांचा ढोल वाजवताना अंदाज पाहण्यासाठी मात्र ग्रामस्थांनी मोठी गर्दीही केली होती. एकीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका सांगितला आहे. त्यामुळे असे कार्यक्रम करायला सरकारने परवानगी नाकारली असतांना खासदार नवनीत राणा यांनी अनेक नागरिकांसोबत विनामास्क ढोल वाजविल्याने कोरोना नियमांना फाटा दिल्याचे दिसून आले. सर्वसामान्य लोकांवर कारवाई केली जाते मग खासदार नवनीत राणा यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.