मिटटी के सितारे : गरीब कुटुंबातील मुलांच्या प्रतिभेला मिळणार नवे व्यासपीठ

'मिटटी के सितारे' गरीब मुलांमधील संगीत प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे काम करणारा देशातील पहिला रिऍलिटी शो

Updated: Feb 1, 2019, 12:23 PM IST
 मिटटी के सितारे : गरीब कुटुंबातील मुलांच्या प्रतिभेला मिळणार नवे व्यासपीठ title=

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गरीब मुलांसाठी 'मिटटी के सितारे' ही नवीन मोहीम सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील अनेक गरीब मुले ज्यांना घरातील कठीण परिस्थितीमुळे गुणवत्ता असूनही पुढे जाता येत नाही, अशा गरीब प्रतिभाशाली मुलांसाठी 'मिटटी के सितारे' रिऍलिटी शो सुरू करण्यात येणार आहेत. गरीब मुलांमधील संगीत प्रतिभेला एक योग्य दिशा देण्याचे काम करणारा 'मिटटी के सितारे' हा देशातील हा पहिला रिऍलिटी शो असणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे दबलेल्या गरीब कुटुंबातील मुलांच्या प्रतिभेला या शोमुळे नवा प्लॅटफार्म मिळणार आहे.

या शोमध्ये भाग घेणाऱ्या मुलांचे वय ७ ते १५ वर्षांपर्यंत असणार आहे. या शोचे संपूर्ण काम दिव्यांज फाउंडेशनद्वारा केले जाणार आहे. मुंबईतील दादर येथे अमृता फडणवीस, संगीतकार शंकर महादेवन, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, बिर्ला फाउंडेशनच्या नीरजा बिर्ला या मोहिमेत सहभागी असून समाजातील कौटुंबिक तसेच इतर काही कारणांमुळे पुढे येऊ न शकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना प्रवाहात आणणे हा या सर्वांचा या मागचा उद्देश आहे.

गरीब प्रतिभावान मुलांना त्यांची योग्य दिशा मिळावी हे माझं स्वप्न आहे. अनेक गरीब मुलांमध्ये गुणवत्ता आहे, त्यांची मेहनत करण्याची तयारी आहे. परंतु, काही आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे त्यांना शिकता येत नाही, पुढे जाता येत नाही. अशा मुलांना या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.  

या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या ११८७ शाळकरी मुलांना घेतले जाणार असून, त्यांना बॉलिवूड गायक, संगीतकार शंकर महादेवन यांच्या संगीत अकादमीमधून संगीताचे शिक्षण दिले जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच याची सुरूवात होणार आहे. यासाठी ४ ऑडिशन फेऱ्या होणार असून जवळपास १० हजार मुलांचे ऑडिशन घेतले जाणार आहे. प्रत्येक शाळेतून ५ मुले निवडली जाणार आहेत. शेवटी ३० मुलांना शॉर्टलिस्ट केले जाणार असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर या मुलांमधून ग्रॅन्ड फिनाले घेण्यात येणार आहे.